त्रिवेणी न्यूज एक्सप्रेस
एटापल्ली | तालुका प्रतिनिधी: गिरीष डी. नरोटे
रूढी, प्रथा व पारंपरिक रीतीरिवाजांनुसार सुरजागड येथे ‘भूमकाल नोवा पूजा’ उत्साहात संपन्न!
दिनांक १७ सप्टेंबर २०२६ (गुरुवार) रोजी एटापल्ली तालुक्यातील मौजा सुरजागड इलाका ग्रामसभा अंतर्गत सुरजागड येथे सुरजागड इलाक्यातील सर्व जनतेने एकत्र येऊन आदिवासींचे दैवत ‘ओदाल पेन’ ठाकूर देव देवस्थान येथे पारंपरिक पद्धतीने भूमकाल प्रकृती ‘नोवा पूजा’ (नवाखानी) अत्यंत भक्तिभावाने व उत्साहात साजरी केली.
आदिवासींच्या रूढी व परंपरेनुसार याप्रसंगी ‘पत पूजा’ व ‘गडाई पूजा’ केली जाते. यामध्ये शेतात नव्याने उगवलेले अन्नधान्य आणि नवीन पुंगर प्रकृती मातेला अर्पण केले जातात. पावसाळा सुरू झाला की शेतामध्ये अन्नधान्याची पेरणी सुरू होते; ज्यामध्ये धान, मका, अंबाडी, भुईमूग, बरबटी यांसारखी विविध कडधान्ये पेरली जातात. या सर्वांमध्ये मक्याचे पीक सर्वात लवकर तयार होत असल्याने सर्वप्रथम ‘जोना नोवांग’ म्हणून पूजा केली जाते.
सुरजागड इलाक्यातील सर्व गावांतील नागरिक एकत्र येऊन आधी ही मुख्य पूजा पार पाडतात. यानंतरच इलाक्यातील सर्व नागरिक आपापल्या गावात ‘जोना नोवांग’ पूजा करतात. ही पूजा संपन्न झाल्यानंतरच शेतातील नवीन कडधान्य व अन्नधान्याची कापणी व वापर करण्यास सुरुवात केली जाते.
या पारंपरिक पूजेसाठी सुरजागड इलाक्यातील सर्व गावांतील गाव पाटील, भूमिया, अध्यक्ष, सचिव, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, इलाका समितीचे आजी-माजी पदाधिकारी तसेच सुरजागड क्षेत्रातील बहुसंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
