गावात शाळा, तरी शिक्षणासाठी जंगलवाट!
सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्या गावभेटीत वास्तव उघड;
२७ विद्यार्थ्यांसाठी दोन शिक्षक, तीन विद्यार्थिनींचा रोज २ किमी जंगलातून प्रवास
प्रतिनिधी : सुगत उराडे
एटापल्ली : शिक्षणासाठी शाळेची पायरी चढण्याचे वय असलेल्या तीन विद्यार्थिनींना सध्या दररोज जंगलाची वाट तुडवत शाळेत जावे लागत असल्याचे धक्कादायक वास्तव एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम कोसा, आलेंगा गावात समोर आले आहे. गावात शाळेची इमारत असतानाही शिक्षक उपलब्ध नसल्याने या विद्यार्थिनींना तब्बल दोन किलोमीटर अंतरावरील कोहका येथील शाळेत जावे लागत आहे. विशेष म्हणजे, या मार्गावर वन्यप्राण्यांचा धोका असून परिसरात वाघाची दहशत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी गुरुवारी गडचिरोली दौऱ्यादरम्यान कोसा, आलेंगा येथे भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी विद्यार्थिनींसोबत कोहका येथील शाळेपर्यंतचा प्रवास करत परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली.
गावात शाळा असूनही विद्यार्थ्यांना दुसऱ्या गावात जाण्याची वेळ
गावात शाळा असतानाही विद्यार्थ्यांना दुसऱ्या गावात का जावे लागते, हा प्रश्न या भेटीदरम्यान केंद्रस्थानी आला. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, कोसा, आलेंगा येथील शाळेची इमारत जीर्ण अवस्थेत असून शिक्षक उपलब्ध नसल्यामुळे येथील तीन विद्यार्थिनींना कोहका येथील शाळेत पाठविले जात आहे.
कोसा, आलेंगा येथील शाळा कोहका येथे भरविण्यात येत असल्याचा फलकही तेथे लावण्यात आला आहे. २७ विद्यार्थ्यांसाठी केवळ दोन शिक्षक कार्यरत असून पहिली ते चौथीचे वर्ग एकाच खोलीत भरविले जात असल्याचे पाहणीत दिसून आले.
जंगलवाटेने प्रवास; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न
विद्यार्थिनींना दररोज जंगलातून सुमारे दोन किलोमीटरचा प्रवास करावा लागत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरात वाघाची दहशत असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्पदंश अथवा वन्यप्राण्यांचा हल्ला झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल अभिजित दीपके यांनी उपस्थित केला.
बंद शाळेची ग्रामसेवकांकडून साफसफाई
दरम्यान, गावातील बंद शाळेची ग्रामसेवकांकडून साफसफाई करण्यात आल्याची माहितीही समोर आली. मात्र, बंद शाळेची साफसफाई झाली; आता शिक्षण कधी सुरू होणार? असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
गावात शाळेची इमारत, विद्यार्थी मात्र दुसऱ्या गावात आणि त्यासाठी जंगलवाटेचा प्रवास, अशी स्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी केवळ तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी कायमस्वरूपी व्यवस्था करण्याची गरज असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
“कोसा, आलेंगा येथील शाळा लवकरच नियमित सुरू करण्यात येणार आहे. तसेच शाळेसाठी नवीन इमारतही मंजूर झाली असून, येत्या काही दिवसांत आवश्यक कार्यवाही पूर्ण करून शाळेची परिस्थिती सुरळीत करण्यात येईल.”
— एच. बुरडकर, गट शिक्षणाधिकारी, पं. स. एटापल्ली»
“मंत्री-अधिकाऱ्यांच्या मुलांना अशा शाळेत पाठवणार का?”
विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या परिस्थितीवर भाष्य करताना अभिजित दीपके यांनी प्रशासनाला सवाल केला. मंत्री, वरिष्ठ अधिकारी किंवा प्रशासनातील एखाद्या जबाबदार व्यक्तीच्या मुलाला अशाच परिस्थितीत शिक्षणासाठी रोज दोन किलोमीटर जंगलातून पायी पाठवण्याची वेळ आली असती, तर त्यांनी अशीच व्यवस्था स्वीकारली असती का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबवल्या जात असल्या, तरी शाळांच्या मूलभूत सुविधांची स्थिती अद्यापही चिंताजनक असल्याचे या पाहणीतून समोर आले आहे.
दरम्यान, दीपके यांनी गडचिरोली दौऱ्यादरम्यान डुम्मे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेलाही भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुरक्षित, सुलभ आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने प्रत्यक्ष परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज या घटनांमधून अधोरेखित झाली आहे.
