सेवा संकल्प अभियानाचा भव्य शुभारंभ
पीएम श्री जि. प. हायस्कूल सिरोंचा येथे महिनाभर विविध उपक्रमांचे आयोजन
सपांदक सुरेश तिपट्टीवार
सिरोंचा | दि. १७ सप्टेंबर २०२६
सिरोंचा : पीएम श्री जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, सिरोंचा येथे ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाचा शुभारंभ गुरुवारी शाळेच्या प्रांगणात उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिरोंचाचे तहसीलदार अजय सुकंदरवार होते. यावेळी गटविकास अधिकारी सुखीराम कस्तुरे, नायब तहसीलदार एन. सिडम, गटशिक्षण अधिकारी किशोर चव्हाण, नगरपरिषदेचे सीईओ राहुल राऊत, शाळेचे मुख्याध्यापक एन. आर. मरस्कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याशिवाय मंडळ कृषी अधिकारी सपना राहसे, आयसीडीएसच्या वैशाली कोल्हे, उपअधीक्षक भूमि अभिलेख हर्षवर्धन डिकीकर, आर.आय. वैद्य सर आणि केंद्रप्रमुख कृष्णारेड्डी सोमनपल्ली यांच्यासह विविध विभागातील अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
‘विकसित भारत २०४७’च्या ध्येयावर भर
प्रास्ताविक करताना नरेंद्र हलामी यांनी अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच ‘विकसित भारत २०४७’ या ध्येयाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा सहभाग आणि सामाजिक जाणीव वाढविण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.
गटविकास अधिकारी सुखीराम कस्तुरे यांनी स्वच्छता, जलसंवर्धन आणि पाण्याची बचत या विषयांवर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात तहसीलदार अजय सुकंदरवार यांनी कृषी, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत विषयांचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांना आवश्यक असलेली जात प्रमाणपत्रे व अधिवास प्रमाणपत्रे वेळेत प्राप्त करून घेणे आवश्यक असल्याचे सांगतानाच स्व-विकासाकडेही लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे ज्येष्ठ शिक्षक के. वाय. जगदाभी यांनी केले. आभार रामगोपाल अट्टेला यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन ए. डब्ल्यू. सोनेकर सर आणि मादेशी सर यांनी केले.
