‘स्कूल ठीक करो’ अभियानांतर्गत पैडी जिल्हा परिषद शाळेची पाहणी
भौतिक सुविधांचा घेतला आढावा; शिक्षण अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा, सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी
प्रतिनिधी : गिरीश नरोटे
एटापल्ली | दि. १७ सप्टेंबर २०२६
एटापल्ली : ग्रामीण भागातील शाळांमधील मूलभूत सुविधांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी सुरू असलेल्या ‘स्कूल ठीक करो’ अभियानांतर्गत कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक मा. अभिजित दिपके यांनी गुरुवारी (दि. १७) मौजा पैडी, ता. एटापल्ली येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन शाळेतील उपलब्ध भौतिक सुविधांची पाहणी केली.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या मूलभूत सोयी-सुविधा, शैक्षणिक वातावरण तसेच इतर भौतिक सुविधांचा आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी आवश्यक सुविधांबाबत संबंधितांकडून माहिती घेण्यात आली.
शाळेतील आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पंचायत समितीतील शिक्षण अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून शाळेला आवश्यक असलेल्या सुविधा शक्य तितक्या लवकर उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी विनंती मा. अभिजित दिपके यांनी केली.
ग्रामीण शाळांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न
‘स्कूल ठीक करो’ अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजा, शैक्षणिक सुविधा आणि भौतिक अडचणींचा प्रत्यक्ष आढावा घेऊन त्या संबंधित प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांना चांगले शैक्षणिक वातावरण मिळण्यासाठी शाळांमध्ये आवश्यक त्या सुविधा उपलब्ध असणे महत्त्वाचे आहे. यासाठी संबंधित विभागाने शाळांच्या गरजांचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
ग्रामस्थांची उपस्थिती
या पाहणीदरम्यान नितीन भाऊ पदा, ग्रामसभा अध्यक्ष, गडचिरोली; कोवे महाराज, कोडापे जी, कोतुराम दादा पोटावी, देविदास मट्टामी, महादेव पदा, दीपक पदा, सचिनभाऊ मोतकुलवार तसेच पैडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
