कंबालपेठा अट्टी वागू नाल्याचे अर्धवट काम ठरतेय डोकेदुखी; ३० गावांचा संपर्क धोक्यात!
विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास विलंब; तात्पुरता डायवर्शन रस्ता देण्याची रामकृष्ण रामय्या निलम यांची तहसीलदारांकडे मागणी
सिरोंचा | दि. १७ सप्टेंबर २०२६ : कंबालपेठा अट्टी वागू नाल्यावर सुरू असलेल्या पुलिया बांधकामाचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने परिसरातील सुमारे ३० गावांतील नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नाल्यात पाण्याचा प्रवाह वाढल्याने बस तसेच खासगी वाहनांची वाहतूकही प्रभावित होत असून, नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या मार्गावरून शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्ता वाहतुकीस योग्य नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यास विलंब होत असल्याची बाबही पुढे आली आहे. मुख्यालयापासून दूर असलेल्या गावांतील नागरिकांना शासकीय कामे तसेच मूलभूत सुविधांसाठी ये-जा करणे अधिक कठीण बनले आहे.
या पार्श्वभूमीवर रामकृष्ण रामय्या निलम यांनी १७ सप्टेंबर रोजी तहसीलदार, तहसील कार्यालय सिरोंचा यांच्याकडे लेखी अर्ज सादर केला. पुलाचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नाल्यावर तात्पुरते डायवर्शन करून रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
अर्धवट बांधकामामुळे निर्माण झालेल्या वाहतुकीच्या समस्येवर प्रशासन तातडीने कोणती उपाययोजना करते, याकडे ३० गावांतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
