एटापल्ली टोला गोटूल येथे आदिवासी बांधवांच्या प्रलंबित प्रश्नांवर जनजागृती; उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन
जनहितवादी समिती व सहभागी पक्ष-संघटनांचा उपक्रम; निराधार व वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटित होण्याचे आवाहन
गडचिरोली / एटापल्ली (विशेष प्रतिनिधी – गिरीष डी. नरोटे):
दुर्गम व अतिदुर्गम भागातील निराधार, दुर्लक्षित आणि वंचित आदिवासी बांधवांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या न्याय्य हक्कांची जाणीव करून देण्यासाठी एटापल्ली जनहितवादी समिती व सहभागी पक्ष-संघटनांच्या वतीने टोला गोटूल येथे एका विशेष बैठकीचे व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमादरम्यान एटापल्ली तालुक्यातील दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या दैनंदिन अडचणी, प्रलंबित मागण्या आणि शासकीय योजनांपासून वंचित असण्यामागची कारणे यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आदिवासी समाजाला त्यांच्या घटनात्मक हक्कांची माहिती देऊन मार्गदर्शन केले. तसेच, गावातील मूलभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण आणि इतर प्रलंबित प्रश् सोडवण्यासाठी सर्वांनी संघटित होऊन लढा देण्याचे आवाहन याप्रसंगी करण्यात आले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात, आदिवासी बांधवांच्या विविध प्रलंबित समस्यांचे तातडीने निराकरण करावे या मागणीसाठी मा. उपविभागीय अधिकारी (एस.डी.ओ.) यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
शासकीय योजनांचा थेट लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचावा आणि वंचित बांधवांना न्याय मिळावा यासाठी समिती व सहभागी संघटना यापुढेही सातत्याने पाठपुरावा करतील, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला. या बैठकीला परिसरातील आदिवासी बांधव, ग्रामस्थ व विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
