एटापल्लीतील १३ अंगणवाडी केंद्रांच्या संयुक्त विद्यमाने ‘पोषण माह’ उत्साहात
नगरसेवक राघवेंद्र सुल्वावार यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे दीपप्रज्वलन
तालुका प्रतिनिधी : सुगत उराडे
२४ सप्टेंबर २०२६
एटापल्ली : नगरपंचायत एटापल्ली क्षेत्रातील सर्व १३ अंगणवाडी केंद्रांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, २४ सप्टेंबर रोजी अंगणवाडी केंद्र क्रमांक ६ येथे ‘पोषण माह’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला नगरपंचायतीचे माजी बांधकाम सभापती तथा नगरसेवक राघवेंद्र सुल्वावार यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला नगरसेवक राघवेंद्र सुल्वावार यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी अंगणवाडी सेविका गुलशन शेख यांनी ६ ते ८ महिन्यांच्या बालकांना पूरक पोषण आहार (THR) कोणत्या पद्धतीने तयार करून द्यावा, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच बालकांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी संतुलित व योग्य पोषण आहाराचे महत्त्व, आहार तयार करण्याची पद्धत आणि बालकांना वयानुसार आहार देण्याबाबत प्रात्यक्षिकातून माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून अर्चना कोदामी (स्तनदा माता) उपस्थित होत्या. यावेळी अंगणवाडी सेविका गुलशन शेख, वच्छला तलांडे, राजश्री खोब्रागडे, छाया रामटेके, सुवर्णा फुलमाळी, कविता मुलमुले, अनुसया झाडे, सुमन गावडे, लता कोकुलवार, प्रेमीला ओल्लालवार, हंसमाला कुंभारे, कौतुका रामटेके व करुणा मडावी यांच्यासह अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.
तसेच पालक संजीवनी साखरे, मीनाक्षी मडावी, गोरडवार ताई, दिकोंडवार ताई, चंद्रकला पंढराम यांच्यासह परिसरातील महिला व पालकांनी कार्यक्रमात सहभाग नोंदविला.
कुपोषणमुक्त समाजनिर्मितीसाठी जनजागृती
बालकांचे आरोग्य, योग्य पोषण आणि कुपोषणमुक्त समाजनिर्मितीसाठी अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून राबविण्यात येणारे असे उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहेत. या कार्यक्रमामुळे पालकांमध्ये बालकांच्या पोषणाबाबत जागरूकता निर्माण होऊन वयानुसार योग्य आहार देण्याचे महत्त्व अधोरेखित झाले.
