पर्लकोटा नदीला पूर: भामरागडमधील ६३ गावांचा संपर्क तुटला; SDRF ने पुराच्या पाण्यातून बोटीने दोन गंभीर रुग्णांचे वाचवले प्राण
तालुका प्रतिनिधी : सुगत उराडे
भामरागड | २५ सप्टेंबर २०२६:
सतत पडणाऱ्या पावसामुळे पर्लकोटा नदीच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली असून पुराचे पाणी पुलावरून वाहू लागले आहे. यामुळे भामरागड–आलापल्ली मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून भामरागड तालुक्यातील तब्बल ६३ गावांचा जिल्ह्याशी असलेला संपर्क तुटला आहे. या गंभीर पूरपरिस्थितीत राज्य आपत्ती प्रतिसाद दलाने (SDRF) दाखवलेल्या तत्परतेमुळे दोन अत्यंत गंभीर रुग्णांना वेळेत वैद्यकीय मदत मिळणे शक्य झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुरामुळे रस्ते वाहतूक बंद पडलेली असतानाच भामरागड येथील दोन रुग्णांची प्रकृती चिंताजनक झाली. त्यांना पुढील तातडीच्या उपचारासाठी हलवणे अत्यंत गरजेचे होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत SDRF च्या पथकाने देवदूतासारखी मदत केली. पुराचा मोठा धोका असतानाही SDRF च्या जवानांनी दोन्ही गंभीर रुग्णांना बोटीच्या साहाय्याने पर्लकोटा नदी पार करून सुरक्षितपणे हेमलकसा येथे पोहोचवले.
हेमलकसा येथे पोहोचवल्यानंतर लगेचच रुग्णवाहिकेच्या साहाय्याने या रुग्णांना अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत एसडीआरएफने दाखवलेल्या या समयसूचकतेमुळे रुग्णांचे प्राण वाचण्यास मोठी मदत झाली असून त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रशासनाचे नागरिकांना सावधानतेचे आवाहन
पर्लकोटा नदीच्या पुरामुळे तालुक्यातील ६३ गावे संपर्काबाहेर गेल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पूरपरिस्थिती गंभीर असल्याने आणि पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने स्थानिक प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे. नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत नदी, नाले किंवा पुराच्या पाण्यातून प्रवास करण्याचे धाडस करू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे स्पष्ट आवाहन करण्यात आले आहे.
