सिरोंचा वासियाच्या समस्या सोडविण्यासाठी ‘बेधडक क्वीन’ची एंट्री; राणी लक्ष्मीबाईची आठवण करून देत भाग्यश्रीताई आत्राम रस्त्यावर
लोकशाहीच्या मार्गाने जनतेच्या प्रश्नांसाठी पुढाकार; दुष्काळ, धान खरेदी आणि आरोग्य सुविधांचा मुद्दा घेऊन प्रशासनाच्या दारात धडक
सिरोंचा : संकटाच्या काळात जनतेच्या प्रश्नांसाठी कोण पुढे येते, याची चर्चा राजकारणात नेहमीच होत असते. सिरोंचा तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती, धान खरेदीची मर्यादा आणि ग्रामीण रुग्णालयातील सुविधांचा प्रश्न ऐरणीवर असताना माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम यांनी थेट रस्त्यावर उतरून प्रशासनाचे दार ठोठावले.
त्यांनी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांची भेट घेत सिरोंचा तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांच्या प्रश्नांबाबत निवेदन सादर केले. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेची तालुक्यात चर्चा सुरू झाली आहे.
‘बेधडक क्वीन’ म्हणून समर्थकांकडून गौरव
भाग्यश्रीताई आत्राम या जनतेच्या प्रश्नांसाठी पुढे आल्याचे सांगत त्यांच्या समर्थकांनी त्यांना ‘बेधडक क्वीन’ अशी उपमा दिली. संकटाच्या काळात घरात न बसता रस्त्यावर उतरून प्रशासनापर्यंत जनतेचा आवाज पोहोचविणाऱ्या राणी लक्ष्मीबाईच्या धैर्याची आठवण त्यांच्या समर्थकांनी करून दिली.
मात्र राणी लक्ष्मीबाईप्रमाणे शस्त्र हाती घेण्याऐवजी लोकशाहीच्या मार्गाने, निवेदन आणि प्रशासनाशी संवादाच्या माध्यमातून जनतेच्या हक्कांसाठी आवाज उठविणे, अशी या उपक्रमाची भूमिका असल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.
‘लोकांच्या हितासाठी कमर कसली’
सिरोंचा तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा मुद्दा गंभीर असल्याचे सांगत भाग्यश्रीताई आत्राम यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी केली.
शासनाच्या दुष्काळग्रस्त यादीत सिरोंचा तालुक्याचा समावेश नसल्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्याच्या परिस्थितीचा स्वतंत्रपणे विचार करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी करण्यात आली.
‘जनतेच्या अडचणी दिसल्या की शांत बसायचे नाही, तर त्या प्रश्नासाठी प्रशासनापर्यंत पोहोचायचे’, अशी भूमिका त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त करण्यात आली.
धान खरेदी २५ क्विंटल करण्याची मागणी
सिरोंचा तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना सध्याच्या खरेदी मर्यादेमुळे अडचणी येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. प्रति एकर धान खरेदीची मर्यादा २५ क्विंटलपर्यंत वाढवावी, अशी मागणी भाग्यश्रीताई आत्राम यांनी केली.
ग्रामीण रुग्णालयाचाही प्रश्न प्रशासनासमोर
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसोबतच सिरोंचा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांची उपलब्धता, वैद्यकीय उपकरणे आणि उपचार सुविधांचा मुद्दाही त्यांनी प्रशासनासमोर मांडला.
दुर्गम भागातील नागरिकांना उपचारासाठी इतरत्र धाव घ्यावी लागू नये, यासाठी ग्रामीण रुग्णालयात आवश्यक डॉक्टर, कर्मचारी आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
‘संकटात कोण उभे राहते?’ चर्चेला सुरुवात
सिरोंचा तालुक्यात १२४ गावे आणि विविध राजकीय पक्षांचे स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी असताना, दुष्काळाच्या प्रश्नावर प्रत्यक्ष प्रशासनाकडे धाव घेण्याच्या भूमिकेवर आता स्थानिक पातळीवर चर्चा सुरू झाली आहे.
या पार्श्वभूमीवर भाग्यश्रीताई आत्राम यांचे समर्थक म्हणतात की, “लोकांच्या हिताचा प्रश्न समोर आला की राजकीय गणितापेक्षा जनतेच्या अडचणी महत्त्वाच्या; म्हणूनच भाग्यश्रीताई रस्त्यावर उतरल्या.”
त्यामुळे सिरोंच्यात सध्या “संकटाच्या काळात जनतेच्या बाजूने कोण उभे राहणार?” हा प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
यावेळी सिरोंचा नगरपंचायत नगरसेवक रंजितजी गागापूरवार, क्रिष्णमूर्तीजी रिक्कूला, विज्जूजी रंगूवार, मयुरभाऊ पुपलवार, सलाम भाई, विशालभाऊ रंगूवार, लिखितभाऊ रंगूवार, सिद्धीकी भाई, जम्पन्नाजी कंबागोणी आणि सुजलभाऊ कंबलवार उपस्थित होते.
