अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाचही तालुके दुष्काळग्रस्त घोषित करा!
आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या सूचनेनुसार हर्षवर्धन बाबा आत्राम व डॉ. मिताली अक्का आत्राम यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन
पाणीटंचाई, रेगुंटा सबस्टेशनची रखडलेली कामे आणि विविध विकासकामांचे प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडले
प्रतिनिधी : सुगत उराडे
अहेरी : अहेरी विधानसभा क्षेत्रातील अहेरी, एटापल्ली, मुलचेरा, भामरागड आणि सिरोंचा या पाचही तालुक्यांमध्ये निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता संपूर्ण विधानसभा क्षेत्र दुष्काळग्रस्त घोषित करावे, अशी महत्त्वपूर्ण मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.
माजी मंत्री तथा विद्यमान आमदार राजे डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या सूचनेनुसार युवा नेते हर्षवर्धन बाबा आत्राम आणि डॉ. मिताली अक्का आत्राम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी अहेरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्यांकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले.
पाचही तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी
अहेरी, एटापल्ली, मुलचेरा, भामरागड आणि सिरोंचा या पाचही तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून त्याचा शेती आणि ग्रामीण जनजीवनावर परिणाम होत आहे. त्यामुळे या पाचही तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकरी, शेतमजूर आणि सामान्य नागरिकांना शासनाच्या दुष्काळ निवारण योजनांचा लाभ द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
गावागावांतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी नवीन बोअरवेलची मागणी
विधानसभा क्षेत्रातील दुर्गम आणि ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. अनेक गावांमध्ये नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये नवीन बोअरवेलची व्यवस्था करावी. तसेच पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी करण्यात आली.
रेगुंटा सबस्टेशनला वन्यजीव विभागाची परवानगी कधी?
रेगुंटा येथील विद्युत सबस्टेशनचे काम पूर्ण झाले असले तरी वन्यजीव विभागाची (Wildlife Department) आवश्यक परवानगी न मिळाल्यामुळे पुढील काम रखडले असल्याचा मुद्दा निवेदनातून उपस्थित करण्यात आला. वन्यजीव विभागाची परवानगी तातडीने मिळवून प्रलंबित काम सुरू करावे, जेणेकरून परिसरातील वीजपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल, अशी मागणी मुख्यमंत्री महोदयांकडे करण्यात आली.
रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि मूलभूत सुविधांचे प्रश्नही ऐरणीवर
अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाचही तालुक्यांमध्ये रस्ते, वीज, पाणीपुरवठा, आरोग्य आणि शिक्षणासह विविध मूलभूत सुविधांचे प्रश्न प्रलंबित आहेत. दुर्गम व अतिदुर्गम भागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांची माहिती मुख्यमंत्र्यांना देऊन संबंधित विभागांना आवश्यक निर्देश द्यावेत आणि विकासकामांना गती द्यावी, अशी मागणीही करण्यात आली.
जनतेच्या प्रश्नांसाठी शासनदरबारी पाठपुरावा
अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाचही तालुक्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, शेतकरी आणि सामान्य नागरिकांना दिलासा मिळावा तसेच वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले मूलभूत सुविधांचे प्रश्न मार्गी लागावेत, या उद्देशाने हर्षवर्धन बाबा आत्राम आणि डॉ. मिताली अक्का आत्राम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हे निवेदन सादर केले. आता या मागण्यांवर राज्य शासन कोणती कार्यवाही करते आणि दुर्गम भागातील नागरिकांना कधी दिलासा मिळतो, याकडे पाचही तालुक्यांतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
