रेखनार गाव तीन वर्षांपासून अंधारात; गुमडी गावातही वीजपुरवठा सुरू करण्याची CPI ची मागणी!
महावितरणला स्वतंत्र निवेदने सादर; तातडीने वीजपुरवठा सुरू न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
गडचिरोली | एटापल्ली | तालुका प्रतिनिधी : गिरीश डी. नरोटे
दि. ९ नोव्हेंबर २०२६ : एटापल्ली तालुक्यातील ग्रामपंचायत चोकेवाडा अंतर्गत येणाऱ्या रेखनार आणि गुमडी या गावांमध्ये वीजपुरवठ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रेखनार गाव मागील तीन वर्षांपासून अंधारात असून, गुमडी गावातही अद्याप वीजपुरवठ्याची सुविधा उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI) च्या माध्यमातून महावितरणकडे निवेदने सादर करण्यात आली आहेत.
रेखनार गावात मागील तीन वर्षांपासून वीज नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. रात्रीच्या वेळी घरगुती कामे, मोबाईल चार्जिंग तसेच दैनंदिन जीवनातील आवश्यक कामे करताना नागरिकांना अडचणी येत आहेत. महिला, लहान मुले, विद्यार्थी आणि वृद्ध नागरिकांना या समस्येचा विशेष त्रास सहन करावा लागत आहे.
दुसरीकडे, गुमडी या आदिवासीबहुल गावातही वीजपुरवठ्याची सुविधा नसल्याने नागरिकांचे जनजीवन प्रभावित झाले आहे. आधुनिक युगात वीज ही मूलभूत गरज असतानाही दुर्गम भागातील गावांना या सुविधेपासून वंचित राहावे लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना गावात बोलावून आपल्या समस्या मांडल्या. नागरिकांच्या मागणीची दखल घेत CPI च्या वतीने महावितरणच्या एटापल्ली येथील उपकार्यकारी अभियंत्यांना स्वतंत्र निवेदने देण्यात आली.
या निवेदनांमध्ये दोन्ही गावांची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यकतेनुसार नवीन विद्युत खांब उभारणे, वीजवाहिन्या टाकणे, ट्रान्सफॉर्मर आणि इतर आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे, तसेच तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून तातडीने वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, दोन्ही गावांसाठी वीजपुरवठ्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे किंवा नाही, प्रस्तावाची सद्यस्थिती काय आहे आणि प्रत्यक्ष वीजपुरवठा कधी सुरू होणार आहे, याची लेखी माहिती देण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेषतः गुमडी गावाच्या निवेदनावर दहा दिवसांच्या आत लेखी उत्तर देण्याची मागणी करण्यात आली आहे.
आंदोलनाचा इशारा
यावेळी CPI गडचिरोली जिल्हा समितीचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार म्हणाले की, रेखनार गावातील नागरिक मागील तीन वर्षांपासून अंधारात जीवन जगत आहेत, तर गुमडी गावातही वीजपुरवठा उपलब्ध नाही. गावकऱ्यांनी आपली व्यथा मांडल्यानंतर या प्रश्नावर पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुर्गम आणि आदिवासी भागातील नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवता कामा नये. महावितरणने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून दोन्ही गावांमध्ये वीजपुरवठा सुरू करावा. अन्यथा, गावकऱ्यांना सोबत घेऊन भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
आता महावितरण प्रशासन या मागणीची कितपत दखल घेते आणि रेखनार व गुमडी गावांमध्ये वीजेचा प्रकाश कधी पोहोचतो, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
