माओवादमुक्त दिवाळीचा आनंद! पोलिसांनी आदिवासी शेतकरी बांधवांसोबत साजरा केला दीपोत्सव
पोलीस दादालोरा खिडकी उपक्रमांतर्गत पिपली बुर्गी पोलीस स्टेशनचा सामाजिक उपक्रम; विद्यार्थी व ग्रामस्थांना मिठाई आणि फटाक्यांचे वाटप
गडचिरोली | एटापल्ली तालुका प्रतिनिधी : गिरीष डी. नरोटे
एटापल्ली : गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने पोलीस दादालोरा खिडकी उपक्रमांतर्गत रविवार, दिनांक ८ नोव्हेंबर २०२६ रोजी पोलीस स्टेशन पिपली बुर्गी येथे ‘एक दिवाळी आदिवासी शेतकरी बांधवांसोबत – माओवादमुक्त दिवाळी’ हा सामाजिक उपक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला.
या उपक्रमात पोलीस स्टेशन पिपली बुर्गीचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मनोज करे यांच्यासह पोलीस अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते. तसेच मौजा पिपली येथील गाव पाटील सैनू लेकामी, सुरेश लेकामी, सरपंच मुन्ना पुंगाटी, गाव भूमिया डूगा लेकामी, आदिवासी शेतकरी बांधव, ग्रामस्थ तसेच शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आदिवासी शेतकरी बांधव, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांसोबत एकत्रितपणे दिवाळीचा सण साजरा केला. फटाके फोडून दीपोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित शालेय विद्यार्थ्यांना व नागरिकांना मिठाई आणि फटाक्यांचे वाटप करण्यात आले. या अनोख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले, तर ग्रामस्थांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, पोलीस अधिकाऱ्यांनी गावातील नागरिकांशी मनमोकळा संवाद साधत गावातील शांतता, सुरक्षितता, सामाजिक एकोपा आणि विकासाच्या विविध विषयांवर चर्चा केली. पोलीस व नागरिक यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ व्हावे, समाजात सलोखा निर्माण व्हावा आणि आदिवासी भागात शांतता व विकासाला चालना मिळावी, हा या उपक्रमामागील सकारात्मक दृष्टिकोन असल्याचे दिसून आले.
दिवाळी हा केवळ दिव्यांचा सण नसून प्रेम, विश्वास, बंधुभाव आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारा उत्सव आहे. पोलिसांनी आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करून माओवादमुक्त, शांततापूर्ण आणि विकासाभिमुख समाजनिर्मितीचा संदेश दिला.
या उपक्रमामुळे पोलीस आणि नागरिकांमधील जिव्हाळ्याचे संबंध अधिक दृढ होण्यास मदत झाली. उपस्थित सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आनंदमय वातावरणात या सामाजिक उपक्रमाची सांगता झाली.
— त्रिवेणी न्यूज एक्सप्रेस
