आदिवासी शेतकरी बांधवांसोबत पोलिसांनी साजरी केली आनंदाची दिवाळी!
पोलीस दादालोरा खिडकी उपक्रमांतर्गत ‘एक दिवाळी आदिवासी शेतकरी बांधवांसोबत – माओवादमुक्त दिवाळी’ उपक्रम उत्साहात; विद्यार्थ्यांना मिठाई व फटाक्यांचे वाटप
गडचिरोली | एटापल्ली दि. ८ नोव्हेंबर २०२६ प्रतिनिधी : सुगत उराडे
एटापल्ली : गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या पोलीस दादालोरा खिडकी उपक्रमांतर्गत पोलीस स्टेशन पिपली बुर्गी येथे ‘एक दिवाळी आदिवासी शेतकरी बांधवांसोबत – माओवादमुक्त दिवाळी’ हा सामाजिक उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पोलीस आणि आदिवासी बांधवांमधील आपुलकीचे नाते अधिक दृढ व्हावे, तसेच ग्रामीण भागात शांतता, सुरक्षितता आणि विश्वासाचे वातावरण निर्माण व्हावे, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला पोलीस स्टेशन पिपली बुर्गीचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मनोज करे यांच्यासह पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. तसेच मौजा पिपली येथील गाव पाटील सैनू लेकामी, सुरेश लेकामी, सरपंच मुन्ना पुंगाटी, गाव भूमिया डूगा लेकामी, आदिवासी शेतकरी बांधव, ग्रामस्थ आणि शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
यावेळी पोलिसांनी गावकऱ्यांसोबत दिवाळीचा आनंद साजरा केला. विद्यार्थ्यांना व उपस्थित नागरिकांना मिठाई आणि फटाक्यांचे वाटप करण्यात आले. सर्वांनी एकत्रितपणे फटाके फोडून दीपोत्सवाचा आनंद द्विगुणित केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले, तर ग्रामस्थांनीही पोलिसांसोबत दिवाळी साजरी करत आपुलकीचा अनुभव घेतला.
पोलीस-जनता विश्वासाचे नाते अधिक दृढ
हा उपक्रम केवळ दिवाळी साजरी करण्यापुरता मर्यादित न राहता पोलिसांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. गावातील शांतता, सुरक्षितता, सामाजिक एकोपा, परस्पर विश्वास आणि गावाच्या सर्वांगीण विकासाबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. पोलीस दल हे केवळ कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करत नसून सामाजिक सलोखा आणि विकासासाठीही कटिबद्ध असल्याचा विश्वास यावेळी उपस्थितांना देण्यात आला.
दिवाळीसारख्या आनंदाच्या सणानिमित्त पोलीस अधिकारी, कर्मचारी, आदिवासी शेतकरी बांधव, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येत आनंदाचे क्षण अनुभवले. अशा सामाजिक उपक्रमांमुळे पोलीस आणि नागरिकांमधील जवळीक वाढून परस्पर विश्वास, बंधुभाव आणि आपुलकीची भावना अधिक बळकट होत आहे.
‘माओवादमुक्त दिवाळी’चा संदेश देणारा हा उपक्रम आदिवासी भागात शांतता, सामाजिक एकोपा आणि पोलीस-जनता सलोख्याचा सकारात्मक संदेश देणारा ठरला.
स्थळ : पोलीस स्टेशन, पिपली बुर्गी
