दिवाळीनिमित्त भाग्यश्री ताई आत्राम यांचा व्यापारी बांधवांशी स्नेहसंवाद; प्रत्यक्ष भेटून दिल्या शुभेच्छा!
सिरोंचा नगरपंचायत क्षेत्रात व्यापारी मंडळाचे पदाधिकारी व नागरिकांच्या कुटुंबीयांची घेतली भेट; आपुलकीच्या संवादातून जपले जनतेशी जिव्हाळ्याचे नाते
सिरोंचा | प्रतिनिधी
दिवाळीच्या मंगलमय सणाचे औचित्य साधून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा गोंडवाना विद्यापीठाच्या सदस्य सौ. भाग्यश्री ताई आत्राम यांनी सिरोंचा नगरपंचायत क्षेत्रातील व्यापारी बांधव, व्यापारी मंडळाचे पदाधिकारी तसेच विविध कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी त्यांनी व्यापारी बांधवांशी संवाद साधत त्यांच्या सुख-दुःखाची विचारपूस केली. दिवाळी हा केवळ दिव्यांचा सण नसून आपुलकी, बंधुभाव आणि नातेसंबंध अधिक दृढ करण्याचा उत्सव असल्याचे या भेटीतून दिसून आले. त्यांच्या या स्नेहपूर्ण भेटीमुळे व्यापारी बांधव आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
प्रत्येक कुटुंबाच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो, प्रत्येकाच्या घरात प्रगतीचा नवा प्रकाश उजळो, अशी सदिच्छा भाग्यश्री ताई आत्राम यांनी व्यक्त केली.
जनतेशी थेट संपर्क, आपुलकीचा संवाद आणि सुख-दुःखात सहभागी होण्याची भावना हीच खरी समाजसेवेची ओळख आहे. नागरिकांचे प्रेम, आशीर्वाद आणि विश्वास हीच समाजकार्य करण्याची प्रेरणा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
दिवाळीच्या निमित्ताने झालेल्या या भेटीमधून भाग्यश्री ताई आत्राम यांनी जनतेशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध पुन्हा एकदा अधोरेखित केले.
सौ. भाग्यश्री ताई आत्राम यांनी सिरोंचा तालुक्यातील सर्व नागरिकांना व त्यांच्या परिवारांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
