आदिवासी संस्कृतीच्या परंपरेत मौजा पैडी येथे दिवाळी उत्सव उत्साहात साजरा!
पारंपरिक रूढी-परंपरांचे जतन; ग्रामस्थांच्या एकजुटीतून सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक अस्मितेचा संदेश
प्रतिनिधी : सुगत उराडे
दि. १० नोव्हेंबर २०२६
एटापल्ली : गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यांतर्गत येणाऱ्या मौजा पैडी येथे आदिवासी समाजाच्या पारंपरिक संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. या उत्सवात गावातील ग्रामस्थांनी एकत्रित सहभाग घेत पारंपरिक रूढी-परंपरांचे दर्शन घडविले. सणाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि सांस्कृतिक अस्मिता जपण्याचा संदेश देण्यात आला.
आदिवासी समाजाची स्वतंत्र सांस्कृतिक ओळख, जीवनशैली, चालीरीती आणि परंपरा हा समाजाचा अमूल्य ठेवा आहे. पूर्वजांकडून पिढ्यान्पिढ्या जतन होत आलेल्या या परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज आहे. आधुनिकतेच्या युगातही आपल्या मूळ संस्कृतीशी नाळ जोडून ठेवत मौजा पैडी येथील ग्रामस्थांनी दिवाळी उत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक वारसा जपण्याचा आदर्श संदेश दिला.
दिवाळी हा प्रकाश, आनंद आणि उत्साहाचा सण असून, अशा सण-उत्सवांमुळे समाजातील नातेसंबंध अधिक दृढ होतात. गावातील नागरिकांनी एकत्र येत उत्सव साजरा केल्याने परस्पर सहकार्य, आपुलकी आणि सामाजिक एकतेचे वातावरण निर्माण झाले. पारंपरिक संस्कृतीचे जतन करत गावातील एकजूट कायम ठेवण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
पूर्वजांच्या परंपरेचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचावा, आदिवासी संस्कृती आणि सामाजिक मूल्यांचे संवर्धन व्हावे, तसेच गावातील बंधुभाव अधिक दृढ व्हावा, हा संदेश या दिवाळी उत्सवातून देण्यात आला. यावेळी सर्व ग्रामस्थांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी गावभूमिया श्री. मानुजी वड्डे, गाव पाटील बारसु वड्डे, दिनेश वड्डे, शिवाजी वड्डे, नितीन होडी, नितीन पदा, महादेव पदा, गिरीश पदा, संतोष मडावी, शंकर होडी, सावजी होडी, लालसु बड्डे, कानू पदा, सोनू नरोटे, मालूम मट्टामी यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक, प्रतिष्ठित व्यक्ती आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मौजा पैडी येथील या उत्सवाने आदिवासी समाजातील पारंपरिक सांस्कृतिक वारसा, सामाजिक एकजूट आणि सामूहिक उत्सवाची परंपरा जिवंत ठेवण्याचा संदेश दिला.
