एटापल्ली तालुक्यात ग्रामसभांच्या कार्याचा गौरव; गर्देवाडा ग्रामसभेला प्रथम पुरस्कार!
तिटोला येथे आयोजित कार्यक्रमात ग्रामसभांचा सन्मान; गर्देवाडा प्रथम, तिटोला द्वितीय तर कुदरी ग्रामसभेला तृतीय पुरस्कार
गडचिरोली | एटापल्ली | प्रतिनिधी : गिरीष डी. नरोटे
एटापल्ली तालुक्यातील ग्रामपंचायत जाबिया अंतर्गत येणाऱ्या मौजा तिटोला येथे दिनांक ११ नोव्हेंबर २०२६ रोजी ग्रामसभांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी पुरस्कार वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामसभांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कार वितरणात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार ग्रामसभा गर्देवाडा, द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार ग्रामसभा तिटोला, तर तृतीय क्रमांकाचा पुरस्कार ग्रामसभा कुदरी यांना प्रदान करण्यात आला. तसेच उत्कृष्ट कार्यासाठी झरेवाडा ग्रामसभेला प्रोत्साहनपर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला जाबिया ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री. राजू भाऊ नरोटी (जिवनगट्टा), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एटापल्ली तालुका अध्यक्ष श्री. सामा हिचामी, तिटोला गावचे पाटील श्री. उमेश वेलदा, ग्रामपंचायत गट्टाच्या माजी सरपंच सौ. पूनम जेट्टी, श्री. लक्ष्मण जेट्टी, श्री. शामराव दोरपेटी, श्री. मालू वेलदा आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच नवयुवक क्रीडा मंडळ तिटोलाचे अध्यक्ष श्री. पुलसान वेलदा यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पुरस्कार वितरणामुळे ग्रामसभांच्या कार्याला प्रोत्साहन मिळून गावपातळीवरील लोकसहभाग, सामाजिक एकजूट आणि ग्रामविकासाच्या कार्याला नवी ऊर्जा मिळेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. ग्रामसभांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करणारा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला.
