मुसरमगुडा ते कोटमी फाटा रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी जोरात!
CPI चे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; रस्त्याचे सर्वेक्षण करून निधी मंजूर करण्याची मागणी, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा!
गडचिरोली | एटापल्ली | तालुका प्रतिनिधी : गिरीष डी. नरोटे
एटापल्ली तालुक्यातील मुसरमगुडा ते कोटमी फाटा या मार्गाची दुरवस्था लक्षात घेता या रस्त्याचे डांबरीकरण तातडीने करण्यात यावे, अशी जोरदार मागणी भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI), गडचिरोली जिल्हा समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मुसरमगुडा ते कोटमी फाटा हा मार्ग परिसरातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, रस्त्याच्या समस्येमुळे नागरिकांना दैनंदिन प्रवासासह शेतीची कामे, बाजारपेठेत जाणे आणि आरोग्य व शासकीय सेवा मिळवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात या मार्गावरून वाहतूक करणे कठीण होत असल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे.
ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांना आजही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याने प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी भूमिका CPI ने मांडली आहे. संबंधित रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून तांत्रिक सर्वेक्षण करण्यात यावे, आवश्यक अंदाजपत्रक तयार करून प्रशासकीय व तांत्रिक मान्यता मिळवावी आणि पात्रतेनुसार ग्रामीण रस्ते विकास योजना किंवा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून निधी मंजूर करून डांबरी रस्त्याचे बांधकाम सुरू करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
प्रशासनाने आश्वासन नव्हे, तर प्रत्यक्ष काम सुरू करावे!
यावेळी CPI जिल्हा समितीचे जिल्हा सहसचिव कॉम्रेड सचिन मोतकुरवार यांनी प्रशासनाला स्पष्ट भूमिका मांडताना सांगितले की, ग्रामीण आणि आदिवासी भागातील नागरिकांना चांगल्या रस्त्यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागणे ही दुर्दैवी बाब आहे. मुसरमगुडा ते कोटमी फाटा हा रस्ता नागरिकांच्या दैनंदिन जीवनासाठी महत्त्वाचा असून शेतकरी, विद्यार्थी, रुग्ण आणि सामान्य नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत. केवळ आश्वासने न देता सर्वेक्षण करून निधी मंजूर करावा आणि प्रत्यक्ष बांधकाम सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली.
या निवेदनाच्या वेळी कॉम्रेड सचिन मोतकुरवार यांच्या नेतृत्वाखाली गावकरी तसेच गाव पाटील राशीनाथ गावडे यांनी प्रशासनाचे लक्ष या ज्वलंत प्रश्नाकडे वेधले. रस्त्याच्या मंजुरीची सद्यस्थिती आणि पुढील कार्यवाहीबाबत लेखी माहिती देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
मागणीची तातडीने दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा!
मुसरमगुडा ते कोटमी फाटा रस्त्याच्या बांधकामाबाबत प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन कामाला सुरुवात करावी. अन्यथा भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने नागरिकांच्या हक्कासाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
आता जिल्हा प्रशासन या मागणीची कितपत दखल घेते आणि मुसरमगुडा ते कोटमी फाटा रस्त्याच्या डांबरीकरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कोणती ठोस कार्यवाही करते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
