मुलचेरा तालुक्यातील पाच गावांमध्ये भाग्यश्रीताई आत्राम यांची उपस्थिती; कालीमाता पूजोत्सवाला दिली भेट!
गोविंदपूर, श्रीरामपूर, खुदीरामपल्ली, भवानीपूर व शांतिग्राम येथे धार्मिक उत्सवाचा उत्साह; भाविकांशी साधला संवाद, सांस्कृतिक परंपरा जपण्याचे आवाहन
गडचिरोली | मुलचेरा | प्रतिनिधी : सालय्या कंबलवार
मुलचेरा तालुक्यातील गोविंदपूर, श्रीरामपूर, खुदीरामपल्ली, भवानीपूर आणि शांतिग्राम या पाच गावांमध्ये आयोजित सार्वजनिक कालीमाता पूजोत्सव तसेच विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) यांच्या नेत्या मा. सौ. भाग्यश्रीताई आत्राम आणि मा. सौ. शाहीनताई हकीम यांनी उपस्थिती दर्शवून उत्सवाची शोभा वाढवली.
यावेळी त्यांनी विविध गावांतील कालीमाता पूजोत्सवाला भेट देत आई कालीमातेचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. तसेच भजन, कीर्तन, गरबा, नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रम आणि महाप्रसादाच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. पूजा समितीचे पदाधिकारी, आयोजक, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांशी त्यांनी मनमोकळा संवाद साधला.
पाचही गावांमध्ये धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांसह मोठ्या संख्येने भाविकांनी उत्सवात सहभाग घेतला. गावागावांमध्ये पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चना आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
धार्मिक उत्सव हे केवळ पूजेपुरते मर्यादित नसून गावातील सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याचे महत्त्वाचे माध्यम आहेत. अशा कार्यक्रमांमुळे समाजातील आपुलकी आणि एकजूट अधिक दृढ होते, असे प्रतिपादन भाग्यश्रीताई आत्राम यांनी यावेळी केले. त्यांनी सर्व भाविकांना उत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या.
या भेटीदरम्यान विविध गावांतील पूजा समित्यांच्या वतीने भाग्यश्रीताई आत्राम आणि शाहीनताई हकीम यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी विष्णुजी रॉय, मनोज कर्माकर, मायाताई सुनतकर यांच्यासह संबंधित गावांतील पूजा समितीचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते, महिला-भगिनी, युवक आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
पाच गावांतील धार्मिक उत्सवांच्या निमित्ताने साधलेला हा जनसंवाद आणि ग्रामस्थांशी झालेला स्नेहपूर्ण संवाद विशेष लक्षवेधी ठरला.
