पेरमिली ईलाका पट्टीतील सामाजिक एकतेसाठी हर्षवर्धन बाबा आत्राम यांचा पुढाकार!
५० गावांतील प्रमुख नागरिकांशी साधला संवाद; भविष्यात सर्व आदिवासी नेत्यांना समान सन्मान देत सामाजिक कार्यक्रम एकत्रितपणे साजरे करण्याचा सर्वानुमते निर्णय
अहेरी : अहेरी तालुक्यातील पेरमिली ईलाका पारंपरिक पट्टीतील ५० गावांमध्ये सामाजिक एकता आणि पारंपरिक परंपरांचे जतन करण्याच्या दृष्टीने माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम यांनी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. पेरमिली येथे प्रत्यक्ष भेट देत त्यांनी ५० गावांतील प्रमुख नागरिकांशी सविस्तर चर्चा केली. या चर्चेत सामाजिक कार्यक्रमांमध्ये कोणताही राजकीय भेदभाव न करता सर्वांना सोबत घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
पेरमिली ईलाका पारंपरिक पट्टीमध्ये दरवर्षी गढी पूजा आणि गढी दसरा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत आदिवासी समाजाचे लोकप्रतिनिधी तथा नेते राजे अंबरीशराव महाराज आत्राम, आमदार डॉ. राजे धर्मरावबाबा आत्राम आणि माजी आमदार दीपक दादा आत्राम या तिन्ही नेत्यांना सन्मानपूर्वक स्थान दिले जात होते.
मात्र, २०२६ मधील गढी पूजा व गढी दसरा उत्सवाच्या निमंत्रण पत्रिकेत आमदार डॉ. राजे धर्मरावबाबा आत्राम आणि माजी आमदार दीपक दादा आत्राम यांची नावे वगळून केवळ राजे अंबरीशराव महाराज आत्राम यांचे नाव ठेवण्यात आल्याने पेरमिली ईलाका पट्टीतील नागरिकांमध्ये नाराजी व चर्चेला सुरुवात झाली. सामाजिक एकतेचे प्रतीक असलेल्या पारंपरिक उत्सवात राजकीय मतभेद आणले जात असल्याची भावना काही नागरिकांनी व्यक्त केली.
गढी दसऱ्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात धर्मरावबाबा आत्राम यांची भूमिका महत्त्वपूर्ण
दरम्यान, सन २०२४ मध्ये पेरमिली ईलाका पट्टीच्या पारंपरिक गढी दसरा उत्सवासाठी जागा मिळविण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी पट्टीतील नागरिकांच्या मागणीनुसार आमदार डॉ. राजे धर्मरावबाबा आत्राम यांनी नागरिक आणि प्रशासन यांच्याशी चर्चा करून गढी दसरा उत्सवासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला होता.
त्यानंतर याच जागेवर डॉ. राजे धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते आदिवासी समाजाचा सप्तरंगी ध्वज फडकविण्यात आला. तसेच ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमात पेरमिली ईलाका पारंपरिक पट्टीतील ५० गावांच्या नागरिकांनी त्यांचे भव्य स्वागत केले होते.
राजकीय मतभेद बाजूला ठेवून सामाजिक एकतेचा निर्धार!
याच पार्श्वभूमीवर आमदार डॉ. राजे धर्मरावबाबा आत्राम यांच्या सूचनेनुसार माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम यांनी पेरमिली येथे जाऊन ५० गावांतील प्रमुख नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला. या बैठकीत पारंपरिक उत्सवाचे महत्त्व, आदिवासी समाजातील ऐक्य आणि सर्व समाजनेत्यांना दिला जाणारा सन्मान यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या चर्चेअंती भविष्यात पेरमिली ईलाका पारंपरिक पट्टीच्या कोणत्याही सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमात आदिवासी समाजाच्या नेत्यांमध्ये भेदभाव केला जाणार नाही. सर्वांना समान सन्मान देऊन, सर्वांना विश्वासात घेत एकत्रितपणे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
पेरमिली ईलाका पट्टीतील ५० गावांच्या सामाजिक एकतेला अधिक बळकटी देण्यासाठी झालेला हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात असून, पारंपरिक उत्सवांमध्ये राजकीय मतभेदांपेक्षा सामाजिक ऐक्याला प्राधान्य देण्याचा संदेश या चर्चेतून देण्यात आला आहे.
