कोटगुल येथे गडचिरोली पोलिसांकडून आरोग्य शिबिर; 110 नागरिकांची तपासणी
गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने मौजा कोटगुल येथील आठवडी बाजार परिसरात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. पोलीस रुग्णालय गडचिरोली, जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला।
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित शिबिरात तज्ञ वैद्यकीय पथकाने सुमारे 110 नागरिकांची आरोग्य तपासणी केली. नागरिकांना मोफत औषधोपचार देण्यात आले तसेच विविध आजार व पोषण समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले।
यावेळी 06 नागरिकांना पुढील उपचारासाठी विविध रुग्णालयात शिफारस करण्यात आली. महिलांची स्त्रीरोग तज्ञांकडून तपासणी करून आवश्यक सल्लाही देण्यात आला।
शिबिरादरम्यान फिरत्या प्रदर्शनीच्या माध्यमातून शहीद जवानांचे बलिदान, सी-60 जवानांचे शौर्य आणि गडचिरोली पोलीस दलाच्या नागरी कृती उपक्रमांबाबत जनजागृती करण्यात आली।
सन 2021 पासून गडचिरोली पोलीस दलाने 199 आरोग्य मेळाव्यांतून 42 हजारांहून अधिक नागरिकांची तपासणी केली असून विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत।
