सिरोचा नगरपंचायतीच्या हद्दीत शासकीय जागेवर अतिक्रमणाचा विळखा
प्रशासनाची डोळेझाक, पुढाऱ्यांची मिलीभगत, अन् शासनालाच जागा विकत घ्यायची वेळ!
सिरोचा नगरपंचायत स्थापन झाल्यापासून शहरातील शासकीय जमिनीवर अतिक्रमणाचे काळे ढग दाटून आलेत. नगरपंचायत होण्याच्या आगोदर इथं हजारो एकर शासकीय जमीन होती, पण आज बघावं तर सगळीकडं कब्जेदारांचंच राज्य.
कोण करतंय कब्जा?
नाव मोठं लक्षण खोटं असलेल्या बाहुबली कार्यकर्त्यांपासून ते शासकीय नोकरदारांपर्यंत सगळेच या ‘जमीन लुटी’त सामील. प्रभाग क्रमांक 17, 12 आणि 13 मध्ये तर कहरच झाला. जिथं कालपर्यंत मोकळी सरकारी जमीन होती, तिथं आज 8-9 वर्षांतच अतिक्रमणधारकांनी ठाण मांडलं.
दिवसा ढवळ्या चाललंय काय?
या प्रभागात शासकीय जागेवर भर दिवसा खोदकाम करून दोन-दोन मजली इमारती थाटात उभ्या राहतायत. आणि गमतीची गोष्ट म्हणजे नगरपंचायत प्रशासन, प्रभागाचे नगरसेवक अन् महसूल विभागाचे अधिकारी सगळे मूग गिळून गप्प! यांना दिसत नाही का? का दिसूनही न दिसल्यासारखं करतायत? जनतेच्या मनात शंका – नगरसेवक अन् महसूलवाल्यांनीच अतिक्रमणधारकांशी हातमिळवणी करून सरकारी जमिनीची विल्हेवाट लावली की काय?
परिणाम काय?
आज परिस्थिती अशी की सरकारी कार्यालय, शाळा, अंगणवाडी बांधायला गावात एक गुंठाही जागा शिल्लक नाही. उद्या शासनाला एखादं कार्यालय उभारायचं झालं तर स्वतःची जमीन विकत घ्यावी लागेल. म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा! अतिक्रमणधारक जणू शासनालाच ‘ओपन चॅलेंज’ देतायत – “हिम्मत असेल तर काढून दाखवा”.
संपादकीय टिपण्णी : टोला शासनाला अन् नगरपंचायतीला
अरे, नगरपंचायत वाल्यानो अन् महसूलच्या साहेबांनो, तुमच्या नाकाखालीच सरकारी जमिनी गिळल्या जातायत अन् तुम्ही झोपा काढताय? एकदा का अतिक्रमणधारकांना मोकळं रान दिलं की उद्या तुमच्या खुर्चीखालची जमीनही ते खेचून घेतील, ध्यानात ठेवा.
‘कायदा कागदावर अन् कब्जा जमिनीवर’ अशी अवस्था झालीय सिरोचाची. जर आजच लगाम नाही घातला तर उद्या सिरोचा नावालाच शासकीय जागा उरणार नाही. अतिक्रमणधारकाला जर धाक राहिला नाही, तर तो गावतलावावरबी इमारत बांधील, मग बघत बसाल.
सवाल जनतेचा
नगरसेवक कशाला निवडून द्यायचे? महसूल अधिकारी कशाला पोसायचे? जर शासकीय जागेची राखणच करता येत नसेल तर खुर्च्या खाली करा. सिरोचाच्या जनतेला उत्तर द्या – हजारो एकर जमीन गेली कुठं?
शासनाने आता तरी डोळे उघडावेत. तातडीने सगळ्या अतिक्रमणांची मोजणी करून, बड्या-छोट्या सगळ्या कब्जेदारांवर बुलडोझर फिरवावा. नाहीतर येणाऱ्या पिढीला शाळा-हॉस्पिटलसाठी बी जागा भाड्याने घ्यावी लागेल
- संपादक :– सुरेश तिपट्टीवार
