सिरोंचा तालुक्यात तात्काळ धान खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी
Sironcha : सिरोंचा तालुक्यात उन्हाळी धानाची कापणी पूर्ण झाली असून अद्यापही शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तालुक्यात एकूण ९ धान खरेदी केंद्रे असून विठ्ठलरावपेठ, जाफराबाद, बामणी, अमरावती, सिरोंचा, पेंटीफाका, वडदम, अकीसा आणि आसरल्ली येथे केंद्र सुरू करण्यात येतात. मात्र अद्यापही खरेदी प्रक्रिया सुरू न झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
याबाबत मा. जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्या मार्फत मा. तहसीलदार, सिरोंचा यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शासनाने धान खरेदी केंद्र सुरू करण्यास विलंब केल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी अनेक शेतकरी नाइलाजास्तव आपला शेतमाल कमी दरात खासगी व्यापाऱ्यांना विकत आहेत.
वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर हमीभावापेक्षा कमी दराने धान विकणे शेतकऱ्यांना परवडणारे नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन धान खरेदी प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनाद्वारे करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत —
१) सिरोंचा तालुक्यातील सर्व ९ शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रे तात्काळ सुरू करावीत.
२) शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया जलद गतीने राबवून टोकन पद्धतीत पारदर्शकता आणावी.
३) धान खरेदीनंतर शेतकऱ्यांना वेळेवर चुकारे देण्यात यावेत.
४) केंद्र सुरू करण्यात झालेल्या विलंबामुळे शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान लक्षात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करावी.
सध्या तालुक्यातील अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून प्रशासनाने तात्काळ निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
