Sironch मुसळधार पाऊस आणि आपत्तीशी लढण्यासाठी पोलिसांची युद्धपातळीवर तयारी
सिरोंचा : आगामी मान्सून काळात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्तीला तोंड देण्यासाठी सिरोंचा पोलिस प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी संदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मारुती नांदे, पोलिस अंमलदार तसेच आपदा मित्र किरण वेमुला यांनी व्यापक तयारीला वेग दिला आहे.
मुसळधार पाऊस, नदी-नाल्यांना पूर, झाडे कोसळणे आणि वाहतुकीत अडथळे निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिस विभाग सतर्क झाला असून सिरोंचा पोलिस ठाण्यात आपत्कालीन बचाव साहित्य, वायरलेस यंत्रणा, बोट व्यवस्था आणि सुरक्षा साधनांची तपासणी करण्यात येत आहे. पूरप्रवण भागांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून प्रत्येक हालचालीवर पोलिसांची करडी नजर आहे.
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना त्वरित मदत मिळावी यासाठी महसूल विभाग, आरोग्य विभाग, स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाशी समन्वय साधण्यात आला आहे. नदीकाठच्या गावांमध्ये जनजागृती मोहीम राबवून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या जाणार आहेत.
पावसाळ्यात नागरिकांनी नदी-नाले, पूरग्रस्त भाग आणि धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
“नागरिकांच्या सुरक्षेसाठी सिरोंचा पोलिस प्रशासन २४ तास सज्ज असून कोणत्याही संकटाला तात्काळ प्रतिसाद दिला जाईल,” असा विश्वास पोलिस विभागाने व्यक्त केला आहे.
