सिरोंचा तालुक्यात 39 ग्रामपंचायतींमध्ये तेंदूपत्ता लिलाव प्रक्रिया सुरू ; ग्रामपंचायत प्रशासनाला लाखोंचा फटका ?
सिरोंचा तालुक्यात दरवर्षी तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम सुरू होताच आदिवासी व गरीब कुटुंबांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो. तालुक्यातील तब्बल 39 ग्रामपंचायतींमध्ये तेंदूपत्ता संकलन प्रक्रिया सुरू असून अनेक ठिकाणी लिलाव प्रक्रिया ग्रामपंचायत स्तरावर न होता सामूहिक वनहक्क समितीमार्फत पार पाडली जात असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सामूहिक वनहक्क समितीकडून ठेकेदारांसोबत एग्रीमेंट करून तेंदूपत्ता लिलाव प्रक्रिया राबवली जाते. मात्र दुसरीकडे ग्रामपंचायत स्तरावर लिलाव प्रक्रिया झाल्यास ठेकेदारांकडून अनामत डी.डी., कर स्वरूपातील रक्कम तसेच कायदेशीर एग्रीमेंट घेतले जात असल्याने ग्रामपंचायतीला आर्थिक संरक्षण मिळत असल्याचे जाणकारांचे मत आहे.
महत्वाची बाब म्हणजे अनेक वेळा तेंदूपत्ता संकलन सुरू झाल्यानंतर काही ठेकेदार बोलीत कबूल केलेली रक्कम न देणे, मजुरांचे पैसे थकवणे किंवा विविध कारणे पुढे करून अडथळे निर्माण करीत असल्याचे आरोप ग्रामस्थांकडून होत आहेत.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, जर संपूर्ण लिलाव प्रक्रिया ग्रामपंचायत प्रशासनामार्फत झाली असती तर ठेकेदारांनी नियमभंग केल्यास त्यांच्या जमा केलेल्या डी.डी. आणि एग्रीमेंटच्या आधारे कठोर कारवाई करता आली असती. गरज पडल्यास फसवणुकीअंतर्गत कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचाही मार्ग खुला राहिला असता.
मात्र सध्याची प्रक्रिया सामूहिक वनहक्क समितीकडे दिल्यामुळे ग्रामपंचायतींचे लाखो रुपयांचे संभाव्य उत्पन्न कमी होत असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.
दिवसभर उन्हात कष्ट करून गरीब व आदिवासी मजूर तेंदूपत्ता तोडतात, मात्र काही ठेकेदारांकडून याच मजुरांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे शासनाने संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणून मजुरांना न्याय द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
