उन्हाच्या तडाख्यात प्रवाशांना दिलासा; सिरोंचा बसस्थानकात शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या यंत्राचे श्री पद्मा सतीश भोगे याच्या हस्ते लोकार्पण
सिरोंचा : वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे सर्वसामान्य नागरिक आणि प्रवाशांना शुद्ध व थंड पिण्याच्या पाण्याची मोठी गरज भासत आहे. याच सामाजिक जाणीवेतून माजी मंत्री तथा आमदार मा. धर्मरावबाबा आत्राम साहेब यांच्या देणगी स्वरूपातील अत्याधुनिक वॉटर प्युरिफायर यंत्राचे लोकार्पण सिरोंचा एसटी बसस्थानक परिसरात करण्यात आले. या यंत्राचे उद्घाटन नगराध्यक्षा श्रीमती पद्माताई भोगे यांच्या हस्ते रिबीन कापून करण्यात आले.
उन्हाळ्यात बसस्थानकावर अनेक प्रवासी तासन्तास बसची प्रतीक्षा करत असतात. अशा वेळी स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी सहज उपलब्ध होणे ही काळाची गरज बनली आहे. या नव्या उपक्रमामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, “पाणी हेच जीवन” या संदेशाला सामाजिक स्वरूप प्राप्त झाले आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अ.प. गट) तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लुरी, नगरसेवक जगदीश रल्लाबंडीवार, नगरसेवक सतीश भाऊ बोगे, शहराध्यक्ष रवी सुलतान, तालुका कार्यकारी अध्यक्ष मदनय्या मादेशी, सेवादल तालुका अध्यक्ष ओमप्रकाश ताटीकोंडावर, अल्पसंख्याक अध्यक्ष जुगनू भाई, वेंकटेश पुजारी, युवा नेते कौशिक बोगे, रमेश मानेम, साईकिरण बोगे तसेच नवीन सांगेम आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी मा. धर्मरावबाबा आत्राम साहेब यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत, “उन्हाच्या कडाक्यात प्रवाशांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे ही खऱ्या अर्थाने लोकसेवा आहे,” असे मत व्यक्त केले.
सार्वजनिक हित लक्षात घेऊन राबविण्यात आलेला हा उपक्रम नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून, भविष्यात अशाच समाजोपयोगी कामांची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.