बामणी येथील धान खरेदी केंद्र तात्काळ सुरू करा… अन्यथा तीव्र आंदोलन!
धान उत्पादक शेतकऱ्यांचे तहसीलदार सिरोंचा यांना निवेदन
सिरोंचा तालुक्यातील बामणी परिसरातील धान उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या अडचणीत सापडले असून, अद्याप धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. अजयभाऊ कंकडालवार यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे युवा नेते रवीभाऊ सल्लम व वसंत डुरके यांच्या नेतृत्वात धान उत्पादक शेतकऱ्यांनी तहसीलदार सिरोंचा यांना निवेदन सादर केले.
निवेदनात स्पष्ट इशारा देण्यात आला असून, येत्या चार दिवसांत बामणी येथील धान खरेदी केंद्र सुरू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे.
शेतकऱ्यांनी प्रशासनावर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. तालुक्यातील धान खरेदी केंद्रे दरवर्षी उशिरा का सुरू होतात? प्रशासन शेतकरी बांधवांना वारंवार त्रास का देते? जुन्या धानाचा साठा गोदामातून वेळेत रिकामा का केला जात नाही? प्रत्येक वर्षी धान विक्रीसाठी शेतकऱ्यांना प्रशासनाच्या दारात हेलपाटे का मारावे लागतात? असे सवाल यावेळी उपस्थित करण्यात आले.
शेतकरी बांधवांनी सांगितले की, वर्षभर कष्ट करून पिकवलेले धान विकण्यासाठीच जर संघर्ष करावा लागत असेल, तर ही शेतकऱ्यांसाठी मोठी शोकांतिका आहे. उन्हात, पावसात राबून शेतकरी धान पिकवतो; मात्र खरेदी केंद्र बंद असल्यामुळे धान घरात पडून राहत आहे. त्यामुळे आर्थिक अडचणींसोबतच मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागत आहे.
धान खरेदी केंद्र वेळेत सुरू न झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असून, प्रशासनाने तातडीने लक्ष घालून बामणी येथील खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे. आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.