📍 सिरोंचा
सिरोंचा नगर पंचायत आता पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पूर्णपणे ॲक्शन मोडवर आली असून नगराध्यक्षांनी शहरातील १७ प्रभागातील नगरसेवकांना पुढील दोन दिवसांत आपल्या-आपल्या प्रभागाची संपूर्ण माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
येत्या काही दिवसांत पावसाळा सुरू होणार असल्याने पावसाच्या पाण्यामुळे नागरिकांना कुठलीही अडचण होऊ नये, यासाठी नगर पंचायत प्रशासन सज्ज झाले आहे. प्रत्येक प्रभागातील नाल्यांची साफसफाई युद्धपातळीवर करण्यात येणार असून पाणी साचणाऱ्या ठिकाणांची पाहणीही केली जाणार आहे.
नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील समस्या, बंद नाले, रस्त्यांवरील अडथळे तसेच नागरिकांच्या तक्रारींची माहिती प्रशासनाला देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नगराध्यक्षांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, पावसाळ्यात नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या नगर पंचायत कर्मचाऱ्यांना आणि संबंधित नगरसेवकांना अजिबात पाठीशी घातले जाणार नाही. जनतेला त्रास होणार नाही, यासाठी प्रशासनाने जबाबदारीने काम करावे, असेही त्यांनी सांगितले.
नगर पंचायतच्या या पूर्वतयारीमुळे यंदाच्या पावसाळ्यात शहरातील पाणी तुंबणे, घाण आणि नाल्यांच्या समस्यांवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
