24 तासांपासून सिरोंज तहसीलातिल 124 गाव अंधारात; 66 केव्ही वीजपुरवठा पुन्हा कोलमडला!
सिरोंचा तालुक्याला वीजपुरवठा करणारी आलापल्ली ते सिरोंचा 66 केव्ही विद्युत वाहिनी पुन्हा एकदा बंद पडल्याने संपूर्ण तालुका तब्बल 23 तासांपासून अंधारात आहे. घनदाट जंगलातून जाणाऱ्या या वीजवाहिनीवर काल सायंकाळी आलेल्या जोरदार वारा आणि पावसाचा मोठा परिणाम झाला. गोविंदगावजवळ विद्युत वाहिनीत बिघाड झाल्याची माहिती मिळताच वीज विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
पाहणीदरम्यान तब्बल तीन ठिकाणी मोठा बिघाड आढळून आला. दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र पुन्हा तपासणी केली असता आलापल्लीपासून जवळपास 71 किलोमीटर अंतरावर आणखी बिघाड असल्याचे समोर आले. सतत होत असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे कर्मचारीसुद्धा हतबल झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
सिरोंचा तालुक्यात वारा आणि पाऊस आला की वीज जाणे ही आता जणू नित्याची बाब झाली आहे. 23 तास वीज नसल्याने शासकीय कार्यालयांचे कामकाज विस्कळीत झाले असून अनेक बँकांचे व्यवहारही ठप्प झाले. मोबाईल नेटवर्क, इंटरनेट सेवा आणि ऑनलाईन कामांवर मोठा परिणाम झाला आहे. डिजीटल युगात जगणाऱ्या सिरोंचा वासियांना मात्र अजूनही मूलभूत वीज सुविधेसाठी संघर्ष करावा लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.
दरम्यान, तेलंगणा राज्यातून सिरोंचा तालुक्याला 132 केव्ही वीजपुरवठा करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. मात्र आजही हे काम अर्धवट अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. हा प्रकल्प वेळेत पूर्ण झाला असता तर सिरोंचा तालुक्याला वारंवार होणाऱ्या वीज समस्येतून मोठा दिलासा मिळाला असता, अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
“डिजीटल इंडिया”च्या घोषणा होत असताना सिरोंचा तालुका मात्र अजूनही अंधाराशी झुंज देत आहे, हे वास्तव प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
