तब्बल 28 तास 27 मिनिटांनंतर सिरोंचा तालुक्याचा वीजपुरवठा सुरळीत
सिरोंचा तालुक्यातील नागरिकांना तब्बल 28 तास 27 मिनिटे अंधाराचा सामना करावा लागल्यानंतर अखेर वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना यश आले. सततच्या पाऊस, वादळी वारा आणि घनदाट जंगलातील तांत्रिक अडचणींवर मात करत कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत घेत अखेर विद्युत सेवा पूर्ववत केली.
आलापल्ली ते सिरोंचा दरम्यान जवळपास 90 किलोमीटर अंतरावरून 66 केव्ही विद्युत वाहिनी घनदाट जंगलातून सिरोंचा येथील सबस्टेशनपर्यंत पोहोचते. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत या परिसरात सतत मुसळधार पाऊस पडत असल्याने वीजवाहिनीची देखभाल करणे अत्यंत कठीण ठरते.
सध्या आलापल्ली महामार्गाची परिस्थितीही अतिशय खराब झाली असून अनेक ठिकाणी चिखल आणि खराब रस्त्यामुळे महावितरणच्या मेंटेनन्स टीमला बिघाडाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी मोठ्या कसरती कराव्या लागत आहेत. 66 केव्ही वीजवाहिनी ब्रेकडाऊन झाल्यानंतर आलापल्ली येथील कर्मचारी जीव धोक्यात घालून जंगलातील दुर्गम भागात पोहोचून दुरुस्तीचे काम करतात.
नागरिकांकडून मात्र जिमलगट्टा येथे स्वतंत्र मेंटेनन्स टीमची मागणी जोर धरू लागली आहे. सिरोंचा तालुक्याजवळच कायमस्वरूपी तांत्रिक पथक उपलब्ध झाल्यास वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तातडीने दुरुस्ती होऊ शकते आणि नागरिकांना तासन्तास अंधारात राहावे लागणार नाही, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
तेलंगणा राज्यातून प्रस्तावित 132 केव्ही वीजपुरवठा प्रकल्पाचे काम गेल्या काही वर्षांपासून रखडले असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास सिरोंचा तालुक्याची वीज समस्या मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.
