“गोवा पर्यटन संपलं… आता तरी वार्डाकडे लक्ष द्या!”
📍 सिरोंचा नगर पंचायतवर नागरिकांचा संताप
सिरोंचा शहरातील अनेक नगरसेवक गेल्या एक ते दीड महिन्यापासून राजकीय घडामोडी, अविश्वास प्रस्ताव, एमएलसी वोटिंग आणि पर्यटनाच्या नावाखाली शहरापासून दूर होते. अखेर गोवा फिरून परतलेल्या नगरसेवकांनी आता तरी आपल्या प्रभागातील समस्यांकडे लक्ष द्यावे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे.
पावसाळा सुरू झाला असून अनेक वार्डांमध्ये नाल्यांतील गाळ अजूनही उपसण्यात आलेला नाही. काही भागांत पथदिवे बंद अवस्थेत आहेत, तर पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. अतिवृष्टीमुळे अनेकांच्या घरात आणि अंगणात पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
“जनतेने निवडून दिल्यानंतर नगरसेवकांनी लोकांच्या अडचणींकडे लक्ष द्यायला हवं. फक्त राजकारण आणि पर्यटन करून चालणार नाही,” अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
विशेष म्हणजे काही वार्डातील नगरसेवकांनी गेल्या वर्षभरात आपल्या प्रभागात साधं ‘मुखदर्शन’ देखील दिलं नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
आता गोव्याची हवा खाऊन मन भरलं असेल, तर नगरसेवकांनी वार्डातील गटार, रस्ते, पाणी आणि दिव्यांच्या समस्यांकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.
