“‘जल जीवन मिशन’चा बोजवारा; पोचमपल्लीतील नागरिकांची पाण्यासाठी वणवण”
गट विकास अधिकारी, पंचायत समितीकडे ग्रामस्थांची आर्त हाक
गर्कपेटा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मौजा पोचमपल्ली येथील नागरिक सध्या पिण्याच्या पाण्याच्या तीव्र संकटाचा सामना करत आहेत. गावात ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेला मिनरल वॉटर प्लांट आज बंद अवस्थेत पडून असून, ग्रामस्थांना शुद्ध पाण्याऐवजी हातपंपाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.
मौजा पोचमपल्ली येथील रहिवासी श्री. जाक्के राजम यांच्या घरासमोर हा शुद्ध पाण्याचा प्लांट उभारण्यात आला होता. गावकऱ्यांना सुरक्षित व स्वच्छ पाणी मिळावे, हा यामागील उद्देश होता. मात्र आज हा प्लांट बंद पडल्याने “वाजले तिन तेरा” अशी अवस्था या योजनेची झाली आहे.
स्थानिक नागरिकांनी अनेकदा ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्यांकडे तक्रारी करूनही या समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले. लोकप्रतिनिधींच्या या उदासीन भूमिकेमुळे गावातील महिला, वृद्ध आणि लहान मुलांना पाण्यासाठी गावोगावी भटकावे लागत आहे.
पहाटेपासून हातपंपावर पाण्यासाठी लागलेल्या रांगा, डोक्यावर हंडे घेऊन उन्हात फिरणाऱ्या महिला आणि तहानलेल्या लेकरांचे चेहरे गावातील गंभीर वास्तव मांडत आहेत. हातपंपातील दूषित पाणी पिण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
“जल जीवन मिशन”चा मुख्य उद्देश प्रत्येक घराला शुद्ध पाणी पुरवणे हा आहे. मात्र पोचमपल्लीमध्ये ही योजना केवळ कागदावरच उरल्याचे चित्र दिसत आहे. लाखो रुपयांचा खर्च करून उभारलेला प्लांट आज बंद असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.
ग्रामस्थांनी गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून बंद असलेला मिनरल वॉटर प्लांट त्वरित दुरुस्त करून सुरू करावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
“शुद्ध पाण्याची योजना आली… पण पाणीच नाही; आता गावकऱ्यांच्या डोळ्यात फक्त आशा आणि प्रशासनाकडे प्रश्न!”
