लाखो रुपयांच्या योजना ठरल्या शोभेच्या वस्तू; जप्राबाद ग्रामपंचायतीच्या कारभारावर संताप
सिरोंचा तालुका समस्यांच्या डोंगराखाली, नागरिकांचा प्रशासनावर सवाल
जप्राबाद, प्रतिनिधी : रवि बारसागांडी
सिरोंचा तालुक्यात विकासाच्या नावाखाली लाखो रुपयांचा निधी खर्च होत असला तरी अनेक योजना प्रत्यक्षात नागरिकांसाठी निष्प्रभ ठरत असल्याचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. जप्राबाद ग्रामपंचायतीत उभारण्यात आलेल्या पाणी टाक्या आणि स्वच्छतेसाठी आणलेली घंटागाडी आज वापराअभावी केवळ शोभेच्या वस्तू बनून उभ्या असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गावातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, पाणीटंचाई दूर व्हावी या उद्देशाने लाखो रुपये खर्च करून दोन पाणी टाक्या उभारण्यात आल्या. मात्र या टाक्यांचा प्रत्यक्ष लाभ ग्रामस्थांना मिळत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अनेक भागांत आजही नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून काही ठिकाणी हातपंप आणि विहिरींवरच अवलंबून राहावे लागत आहे.
याशिवाय ग्रामपंचायतीकडे नुकतीच आलेली नवीन घंटागाडी देखील वापराअभावी बंद अवस्थेत पडून असल्याचे दिसून येत आहे. गावातील स्वच्छता व्यवस्था सुधारण्यासाठी आणण्यात आलेली ही गाडी प्रत्यक्षात रस्त्यावर न उतरल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. “योजना येतात, निधी खर्च होतो; पण सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचत नाहीत,” अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
सिरोंचा तालुक्यात आधीच पाणीटंचाई, खराब रस्ते, अनियमित वीजपुरवठा, आरोग्य सुविधांचा अभाव आणि स्वच्छतेचे प्रश्न गंभीर बनले आहेत. अशा परिस्थितीत विकासकामांवरील लाखो रुपयांचा खर्च केवळ कागदोपत्री राहात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे “सिरोंचा तालुका हा समस्यांचा डोंगर बनला आहे का?” असा सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत.
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकपा) सिरोंचा तालुका सचिव रवि बारसागंडी यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून खर्च झालेल्या निधीचा हिशोब जनतेसमोर जाहीर करावा, अशी मागणी केली आहे. तसेच निष्क्रिय पडलेल्या पाणी टाक्या आणि घंटागाडी तातडीने सुरू न केल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, ग्रामस्थांनी संबंधित विभाग आणि प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच नागरिकांना प्रत्यक्ष सुविधा मिळतील याची खात्री करावी, अशी मागणी केली आहे.
