प्रतिनिधि :– रवि बारसागांडी
सिरोंचा तालुक्यात आशा वर्करांना मोठा दिलासा ; भाकपा-आयटकच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीने दखल
सिरोंचा : कोरोना महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता गावागावात सेवा बजावणाऱ्या आशा वर्करांच्या प्रलंबित कोरोना प्रोत्साहन भत्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाकपा व आयटकच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तसेच ११ जून २०२६ रोजी प्रस्तावित धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने दखल घेत संबंधित भत्ता अदा करण्याचे लेखी आदेश जारी केले आहेत.
दिनांक ०४ जून २०२६ रोजी पंचायत समिती सिरोंचा येथे गटविकास अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले होते. भाकपा जिल्हा सहसचिव तथा आयटक अहेरी विधानसभा अध्यक्ष कॉ. सचिन मोतकुरवार यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी भाकपा जिल्हा सदस्य कॉ. सुरज जककुलवार, भाकपा तालुका सचिव कॉ. रवी बारसांगडी यांच्यासह तालुक्यातील मोठ्या संख्येने आशा सेविका उपस्थित होत्या.
निवेदनामध्ये कोरोना काळात शासनाच्या विविध आरोग्य मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या आशा वर्करांना शासन निर्णयानुसार देय असलेला कोरोना प्रोत्साहन भत्ता तात्काळ अदा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीची गंभीर दखल घेत गटविकास अधिकारी, पंचायत समिती सिरोंचा यांनी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना पात्र आशा सेविकांना कोरोना प्रोत्साहन भत्ता वितरित करण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच सात दिवसांच्या आत अंमलबजावणी अहवाल पंचायत समितीकडे सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
कोरोना महामारीच्या काळात आशा वर्करांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत घराघरांत जाऊन सर्वेक्षण, रुग्ण शोध मोहीम, लसीकरण, जनजागृती, क्वारंटाईन व्यवस्थापन यांसारख्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. संसर्गाचा धोका पत्करूनही त्यांनी आरोग्य यंत्रणेचा कणा म्हणून सेवा दिली. शासन निर्णयानुसार त्यांना प्रतिमहिना एक हजार रुपये प्रमाणे २८ महिन्यांचा कोरोना प्रोत्साहन भत्ता देणे अपेक्षित होते. मात्र हा भत्ता दीर्घकाळ रखडल्याने आशा सेविकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती.
दरम्यान, ११ जून रोजी होणाऱ्या धरणे आंदोलनापूर्वीच प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याने आशा वर्करांना मोठा दिलासा मिळाला आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना कॉ. सचिन मोतकुरवार म्हणाले,
“आशा वर्करांच्या न्याय्य मागण्यांना अखेर प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला, ही आनंदाची बाब आहे. पंचायत समिती प्रशासन तसेच सिरोंचा पोलीस प्रशासनाचे सहकार्य लाभले. आता आदेशांची प्रभावी आणि वेळेत अंमलबजावणी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.”
भाकपा व आयटकच्या सातत्यपूर्ण संघर्षामुळे आशा वर्करांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. :::
