*आरोग्यसेवा आता दुर्गम भागाच्या दारी; आ.डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते ‘स्नेहधर्म डायग्नोस्टिक सेंटर’चे भूमिपूजन*
*गर्देवाडा:* छत्तीसगड सीमेलगतच्या अतिदुर्गम गर्देवाडा येथे स्नेहादेवी राजे धर्मरावबाबा आत्राम बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या ‘स्नेहधर्म डायग्नोस्टिक सेंटरचे’ भूमिपूजन अहेरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते बुधवारी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. युवा नेते हर्षवर्धनबाबा आत्राम तथा डॉ. मिताली आत्राम यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे दुर्गम व आदिवासी भागातील नागरिकांना आधुनिक आणि दर्जेदार आरोग्यसेवा स्थानिक स्तरावर उपलब्ध होणार आहे.
आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांचे गर्देवाडा येथे आगमन होताच ग्रामस्थांनी ढोल-ताशांच्या गजरात व जल्लोषपूर्ण वातावरणात त्यांचे स्वागत केले. भूमिपूजन सोहळ्यास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाबद्दल समाधान आणि आनंद व्यक्त केला.
यावेळी मार्गदर्शन करताना आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, “ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांना वैद्यकीय तपासण्या आणि उपचारांसाठी दूरवर जावे लागू नये, यासाठी आरोग्य सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. दुर्गम भागातील प्रत्येक नागरिकाला सुलभ, परवडणारी आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा मिळावी, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
स्नेहधर्म डायग्नोस्टिक सेंटर हे दुर्गम भागातील जनतेसाठी आरोग्यसेवेचे हक्काचे केंद्र ठरणार असून येथे विविध वैद्यकीय तपासण्या, निदान सेवा आणि आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
विशेष म्हणजे, आजपर्यंत गर्देवाडा व परिसरातील नागरिकांना विविध वैद्यकीय तपासण्यांसाठी जांभिया गट्टा येथे जावे लागत होते. मात्र, हे केंद्र सुरू झाल्यानंतर आवश्यक निदान सेवा स्थानिक स्तरावरच उपलब्ध होणार आहेत. तसेच छत्तीसगड सीमेलगतच्या अनेक गावांतील नागरिकांनाही या केंद्राचा लाभ मिळणार असल्याने सीमावर्ती भागातील हजारो कुटुंबांसाठी हे केंद्र आरोग्यसेवेचे नवे आशास्थान ठरणार आहे.
ग्रामीण आरोग्य क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या या उपक्रमाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. दुर्गम भागातील आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी चिमरी मासू कोडो, उपसरपंच रमेश माहा, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) एटापल्ली तालुकाध्यक्ष संभा हिचामी, भामरागड तालुकाध्यक्ष इंद्रशहा मडावी, संजय चरडुके, बालाजी गावडे, मनीष दुर्गे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
