बामणी सोसायटीचे उद्घाटन; शेतकऱ्यांच्या धान साठवणुकीच्या समस्येला मोठा दिलासा
सिरोंचा प्रतिनिधी : रवि सुलतान
सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या धान साठवणुकीच्या गंभीर समस्येवर उपाय म्हणून बामणी सोसायटीचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. या उपक्रमामुळे रब्बी हंगामातील धान सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे.
शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत त्यांच्या हितासाठी सातत्याने पुढाकार घेणारे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष बनय्या जनगाम, तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लुरी, शहराध्यक्ष रवी सुलतान, सोसायटी अध्यक्ष चिन्ना पेंटा रामन्ना तलांडी, सचिव रामाराव बांदारी, दुर्गम बापू, दुर्गम शंकर, रमेश आदी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला.
रब्बी हंगामातील धान खरेदीनंतर हजारो क्विंटल धान साठवणुकीचा प्रश्न निर्माण झाला होता. अनेक शेतकरी धान उघड्यावर ठेवण्यास मजबूर होते. पावसाळा तोंडावर आल्याने धान भिजून नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये होती. ही परिस्थिती लक्षात घेऊन बामणी सोसायटीमार्फत धान साठवणुकीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी अशा सुविधा अत्यंत गरजेच्या असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या मालाला सुरक्षित साठवणूक मिळाल्यास त्यांना बाजारभाव मिळेपर्यंत धान सुरक्षित ठेवता येईल, असे मत व्यक्त करण्यात आले.
बामणी सोसायटीच्या या उपक्रमामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, शेतकरी हिताच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत व कौतुक होत आहे.
