अतिदुर्गम भागातील विकासाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
“गाव दूर नाही, पण रस्ता नाही”; गुम्मलकोंडा परिसरातील युवकांची हतबलता, CPI ची प्रशासनाकडे धाव
प्रतिनिधी :– रवि बारसागांडी
सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम गुम्मलकोंडा परिसरातील नागरिकांचा रस्त्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या गावांच्या विकासासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (CPI) जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. गुम्मलकोंडा, मुकिडीगुट्टा, मुत्तापूर, टेकडा मोटला तसेच सुंकरली ते असरअल्ली या गावांना जोडणारा पक्का डांबरी रस्ता तातडीने मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
हे निवेदन तहसीलदार श्री सिडाम साहेब, सिरोंचा यांच्या मार्फत देण्यात आले. निवेदनात या भागातील दलित, आदिवासी व कष्टकरी नागरिकांना आजही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे.
पावसाळ्यात गावांचा संपर्क तुटतो
पावसाळा सुरू होताच रस्त्यावर गुडघाभर चिखल साचत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. रुग्णवाहिका सेवा वेळेवर पोहोचत नसल्यामुळे गंभीर रुग्ण, गरोदर महिला किंवा अपघातग्रस्तांना खाटेवरून चिखलातून वाहून मुख्य रस्त्यापर्यंत न्यावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. उपचाराअभावी जीवितहानी झाल्याच्याही घटना समोर आल्याचा दावा CPI ने केला आहे.
दुचाकी अपघातांमध्ये वाढ
रस्ता पूर्णतः खराब व घसरडा झाल्यामुळे दुचाकी अपघातांचे प्रमाण वाढले असून अनेक नागरिक जखमी होत आहेत. वाहनांचे नुकसान होऊन आर्थिक फटकाही बसत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
युवकांच्या विवाहात अडथळे
रस्त्याअभावी सामाजिक जीवनावरही गंभीर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. बाहेरगावचे लोक गावात येण्यास टाळाटाळ करत असल्याने येथील युवकांच्या विवाहात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत.
“गाव दूर नाही, पण रस्ता नाही” या परिस्थितीमुळे अनेक सुशिक्षित युवकांचे संसार थांबले असून युवकांमध्ये नैराश्य वाढत असल्याचे CPI ने निवेदनात नमूद केले.
विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात
वाहतूक व्यवस्था कोलमडल्याने विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात जाणे कठीण होत आहे. अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. तसेच शासकीय कार्यालयांपर्यंत पोहोचण्यात अडचणी येत असल्याने विविध शासकीय योजना व कामेही रखडत असल्याचा आरोप करण्यात आला.
CPI च्या प्रमुख मागण्या
गुम्मलकोंडा, मुकिडीगुट्टा, मुत्तापूर, टेकडा मोटला, सुंकरली ते असरअल्ली या मार्गाला विशेष निधीतून तातडीने पक्का डांबरी रस्ता मंजूर करावा.
पावसाळा लक्षात घेऊन तात्पुरत्या स्वरूपात चिखल काढून खडीकरण व दुरुस्तीची कामे त्वरित हाती घ्यावीत.
आंदोलनाचा इशारा
प्रशासनाने तात्काळ दखल घेतली नाही, तर सर्व बाधित गावांतील नागरिक, युवक, महिला व विद्यार्थ्यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन, जेल भरो व चक्का जाम आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा CPI च्या वतीने देण्यात आला आहे.
या निवेदनावर CPI चे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार, जि. सदस्य कॉ. सुरज जककुलवार, तालुका सचिव कॉ. रवी बारसंगडी यांच्यासह अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
