इंदाराम ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त; नाल्यांतील दुर्गंधी व रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे प्रवास धोकादायक
समाजसेवक तिरुपती मडावी यांची प्रशासनाकडे तात्काळ कारवाईची मागणी
अहेरी तालुक्यातील इंदाराम ग्रामपंचायत अंतर्गत गावामध्ये नाल्यांची योग्य प्रकारे साफसफाई न झाल्याने नागरिकांना दुर्गंधीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच नाल्यांमध्ये गाळ, प्लास्टिक व कचरा साचल्याने सांडपाणी रस्त्यावर येत असून परिसर अस्वच्छ बनला आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
गावातील अनेक रस्त्यांची परिस्थिती देखील अत्यंत बिकट झाली असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचत असल्याने नागरिकांना प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे. दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका निर्माण झाला असून शालेय विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे.
या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत समाजसेवक तिरुपती मडावी यांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे तात्काळ नाली सफाई मोहीम राबवून गाळ काढण्याची मागणी केली आहे. तसेच खराब झालेल्या रस्त्यांवर मुरूम टाकून खड्डे बुजविणे, फुटलेल्या खलवटांची दुरुस्ती करणे व पावसाळ्यापूर्वी आवश्यक कामे पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली.
“पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागू नये, यासाठी प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन कामे हाती घ्यावीत,” अशी ठाम भूमिका तिरुपती मडावी यांनी मांडली आहे. ग्रामस्थांनीही ग्रामपंचायतीने विलंब न करता समस्यांचे निराकरण करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
