जीव मुठीत धरून नाला पार; कुकामेटा पुलासाठी भाकपाचा एल्गार”
“पाच गावे पावसात बेटासारखी तुटतात; प्रशासनाने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा”
प्रतिनिधि;—— रवि बारसागांडी
भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम व आदिवासीबहुल कुकामेटा लष्कर नाला येथे तातडीने पूल बांधण्यात यावा, या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकपा) जिल्हाधिकारी गडचिरोली यांना तहसीलदार भामरागड यांच्या मार्फत निवेदन सादर केले. यावेळी पाच गावांतील शेकडो ग्रामस्थ उपस्थित राहून आपल्या व्यथा प्रशासनासमोर मांडल्या. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही भाकपाने दिला आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सन २०२१-२२ मध्ये कुकामेटा लष्कर नाला येथे पूल बांधकामासाठी साहित्य आणण्यात आले होते तसेच पिलरसाठी खड्डेही खोदण्यात आले; मात्र त्यानंतर काम पूर्णपणे बंद पडले. त्यामुळे गोपनार, लष्कर, आलदंडी, धिंरगी आणि मोरडपार ही पाच गावे दर पावसाळ्यात जगापासून तुटून पडतात.
“पावसाळा आला की आमचं जगणंच थांबतं”
ग्रामस्थांनी आपल्या मनोगतात सांगितले की, चार ते पाच महिने नाल्याला पूर असल्याने गावांतील नागरिक अक्षरशः कैद होतात. गरोदर महिलांना प्रसूतीसाठी बाहेर नेता येत नाही, तर सर्पदंश, मलेरिया किंवा इतर गंभीर आजारांतील रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने जीव गमवावे लागल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
“पूर आला की आम्ही जीव मुठीत धरून नाला पार करतो. अनेकदा बैलगाड्या आणि दुचाक्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. शासनाने फक्त आश्वासने दिली, पण पूल अजूनही अपूर्णच आहे,” अशी संतप्त भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
शिक्षण, आरोग्य आणि रोजगारावर परिणाम
पूरस्थितीमुळे रेशनचे धान्य गावांपर्यंत पोहोचत नाही. स्थानिक शेतमाल व तेंदूपत्ता बाजारात नेता येत नसल्याने आदिवासी बांधवांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होत आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण सलग अनेक महिने ठप्प राहते. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असल्याची खंतही ग्रामस्थांनी व्यक्त केली.
भाकपाच्या प्रमुख मागण्या
भाकपाने प्रशासनाकडे खालील मागण्या केल्या आहेत –
२०२१-२२ मधील अपूर्ण पुलकामाची सखोल चौकशी करावी
कुकामेटा लष्कर नाला पूल मंजूर आहे की नाही याची तातडीने माहिती द्यावी
मंजुरी नसल्यास तात्काळ मंजुरी देऊन निश्चित कालमर्यादेत पूल बांधकाम पूर्ण करावे
आंदोलनाचा इशारा
“आदिवासी नागरिकांचे जीवन धोक्यात असताना प्रशासनाने दुर्लक्ष करणे असंवेदनशीलतेचे लक्षण आहे. यापुढे विलंब सहन केला जाणार नाही,” असा इशारा भाकपाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
यावेळी भाकपा जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार, जिल्हा सदस्य कॉ. सूरज जककुलवार, एआयवायएफ तालुका अध्यक्ष कॉ. दिनेश आरकी, कॉ. सुरेश मज्जी, रमेश कालंगा, देवाजी परसा, सुधाकर आतलामी, दिनेश मटाटामी, अजय कुमोटी, सुरेश दुर्वा, चिन्ना मडकामी यांच्यासह पाचही गावांतील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.
