जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचा सिरोंचा तालुक्यातील रंगायापल्ली व आरडा गावांना दौरा; शेतकऱ्यांना आधुनिक व शाश्वत शेतीचे मार्गदर्शन
गडचिरोली/सिरोंचा, प्रतिनिधी : रवि बारसागांडी
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती प्रीती हिरळकर यांनी नुकताच सिरोंचा तालुक्यातील रंगायापल्ली व आरडा गावांना भेट देऊन कृषी विकास कामांची पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (NDKSP 2.0)’ अंतर्गत सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेत शेतकऱ्यांना ‘शेती बचाओ अभियान’, खतांचा संतुलित वापर तसेच ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर घ्यावयाच्या आवश्यक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना श्रीमती हिरळकर यांनी उत्पादन खर्च कमी करून शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी ‘शेती बचाओ अभियान’ प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन केले. शेती हा केवळ व्यवसाय नसून शाश्वत जीवनपद्धतीचा आधार असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (NDKSP 2.0)’ हा हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेतीसाठी महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याचे सांगत त्यांनी शेतकऱ्यांनी हवामानास अनुकूल पीक पद्धती स्वीकारण्याची गरज व्यक्त केली. प्रकल्पांतर्गत उपलब्ध विविध अनुदाने, तांत्रिक सुविधा आणि मार्गदर्शनाचा लाभ घेऊन शेती अधिक फायदेशीर करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
दौऱ्यादरम्यान त्यांनी रंगायापल्ली व आरडा येथील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी, आगामी खरीप हंगामाची तयारी तसेच शेतीविषयक विविध प्रश्न जाणून घेतले. जमिनीचा कस टिकवून ठेवण्यासाठी माती परीक्षण अहवालानुसारच खतांचा वापर करावा, असा सल्लाही त्यांनी दिला.
“अतिरिक्त रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीचा पोत खराब होतो आणि उत्पादन खर्च वाढतो. त्यामुळे नत्र, स्फुरद व पालाश (NPK) यांचा संतुलित वापर करणे अत्यंत आवश्यक आहे,” असे त्या म्हणाल्या. याशिवाय सेंद्रिय खतांचा वापर वाढवून जमिनीची सुपीकता कशी टिकवून ठेवता येईल, याबाबतही त्यांनी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
हवामानातील बदलांचा शेतीवर होणारा परिणाम लक्षात घेता त्यांनी शेतकऱ्यांना ‘एल निनो’ संदर्भात सतर्क राहण्याचे आवाहन केले. एल निनोमुळे पावसाच्या वितरणात होणारे बदल, दीर्घकालीन पावसाचा खंड किंवा अतिवृष्टीसारख्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांनी आतापासूनच पीक नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले. कमी कालावधीत तयार होणाऱ्या वाणांची निवड तसेच पीक विमा योजनेत सहभाग घेण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.
या दौऱ्यात तालुका कृषी अधिकारी श्री. सी. यू. पाणबुडे, मंडळ कृषी अधिकारी कु. सपना रहासे, आत्मा बीटीएम श्री. लांजेवार, तालुक्यातील उपकृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, समूह सहाय्यक, संबंधित गावांचे सरपंच तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
अधिकाऱ्यांच्या या मार्गदर्शनामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आधुनिक, शाश्वत आणि हवामान बदलास अनुकूल शेतीविषयी नव्या आशा निर्माण झाल्या आहेत.
