UDYAM-MH-10-0029310
अंगणवाडीसमोर घाणीचे साम्राज्यचिमुकल्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू !
जिल्हा परिषद बांधकाम विभागाने उभारलेली इमारत, पण परिसर अस्वच्छ; ग्रामस्थांमध्ये संताप
सोमणपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत मौजा कोत्तुर येथील अंगणवाडी इमारतीचे बांधकाम जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत सुमारे दोन वर्षांपूर्वी करण्यात आले. मात्र अंगणवाडीसमोरील परिसर आजही घाणीच्या विळख्यात अडकलेला असून लहान चिमुकल्या मुलांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
पावसाळा सुरू होताच अंगणवाडीसमोर चिखल, साचलेले पाणी व अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे. दररोज शिक्षण व पोषण आहारासाठी येणाऱ्या लहान मुला-मुलींना या घाणीमधून जावे लागत असल्याने त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. डासांचे प्रमाण वाढल्याने संसर्गजन्य आजारांचा धोका देखील निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, अंगणवाडीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर परिसर स्वच्छता, पाणी निचरा व रस्त्याची कोणतीही योग्य व्यवस्था करण्यात आलेली नाही. जिल्हा परिषद बांधकाम विभाग, ठेकेदार व संबंधित अधिकारी या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
“लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न असताना प्रशासन मात्र शांत बसले आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतरच अधिकारी जागे होणार का?” असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
ग्रामस्थांनी तात्काळ परिसराची स्वच्छता करून पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याची मागणी केली असून अन्यथा आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
