राष्ट्रीय नाट्य विद्यालयाची अहेरीत रंगभूमीची मुहूर्तमेढ; आदिवासी भागातील बालकलाकारांना आता थेट राष्ट्रीय व्यासपीठाची संधी!
अहेरी, प्रतिनिधी : तिरपती मडावी
देशातील प्रतिष्ठित राष्ट्रीय नाट्य विद्यालय, नवी दिल्ली यांच्या वतीने आणि Indian Oil Corporation Limited च्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या “निर्मितीप्रधान बाल रंगभूमी कार्यशाळा – २०२६” या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा अहेरी येथे उत्साहपूर्ण वातावरणात भव्य शुभारंभ झाला. गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना अभिनय, संवादकला, रंगभूमी, व्यक्तिमत्त्व विकास आणि राष्ट्रीय दर्जाचे कलात्मक प्रशिक्षण देणारी ही कार्यशाळा बालकलाकारांसाठी सुवर्णसंधी ठरत आहे.
कार्यक्रमाची सुरुवात रोपपूजनाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यशाळेचे प्रास्ताविक युवा रंगकर्मी राहुल पेंढारकर यांनी केले. त्यांनी रंगभूमी ही केवळ कला नसून मुलांच्या आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि सामाजिक जाणिवा विकसित करणारे प्रभावी माध्यम असल्याचे सांगत कार्यशाळेची उद्दिष्टे स्पष्ट केली.
या कार्यशाळेचे दिग्दर्शन प्रसिद्ध रंगदिग्दर्शक अखिलेश खन्ना करीत असून सह-दिग्दर्शक म्हणून खुशबू कुमारी कार्यरत आहेत. संगीत संयोजनाची धुरा राहुल पेंढारकर यांनी सांभाळली आहे. कार्यशाळेत विद्यार्थ्यांना अभिनय, अभिव्यक्ती, आवाज व वाणी प्रशिक्षण, रंगमंचीय हालचाली, सर्जनशील उपक्रम, संघभावना, आत्मविश्वास विकास तसेच प्रत्यक्ष रंगमंचीय सादरीकरणाचे सखोल प्रशिक्षण दिले जाणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सचिन वनवैभव शिक्षण मंडळ, अहेरीचे अध्यक्ष अब्दुल जमीर अब्दुल हकीम उपस्थित होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात, “गडचिरोलीसारख्या दुर्गम व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण मिळणे ही जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे,” असे सांगत विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांना योग्य दिशा देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्या तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनात कला, संस्कृती आणि शिक्षण यांचा समन्वय घडवून आणण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचे नमूद केले. बालपणापासून मुलांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि सामाजिक जाणीवा रुजविण्यासाठी रंगभूमी प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून शाहिनताई हकीम उपस्थित होत्या. त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळणे आवश्यक असल्याचे सांगत अशा उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देण्याची गरज व्यक्त केली.
तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये प्रतिक आढाव, शाहिद शेख, गजानन लोनवाले, रेखा पारधी, शैलेश पटवर्धन तसेच विलास सिडाम यांचा समावेश होता.
देशातील सात राज्यांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या आठ विशेष कार्यशाळांमध्ये गडचिरोली जिल्ह्याची निवड होणे ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. विशेष म्हणजे, कार्यशाळेच्या समारोपावेळी विद्यार्थ्यांचे थेट रंगमंचीय सादरीकरण होणार असून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नवी दिल्ली येथील राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या रंगमंचावर सादरीकरणाची संधी मिळण्याची शक्यता आहे.
गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि आदिवासीबहुल जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील कलात्मक प्रशिक्षण उपलब्ध करून देणारा हा उपक्रम भविष्यातील कलाकार घडविण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असून जिल्ह्याच्या सांस्कृतिक विकासाला नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
