राकेश-वृषाली विवाह सोहळा आणि रामकिष्टु निलम यांच्या वास्तुपूजेला तनुश्री आत्राम यांची उपस्थिती; परिसरात चर्चेचा विषय
अहेरी, प्रतिनिधी : — तिरुपती मडावी
अहेरी येथील श्री माता कन्यका परमेश्वरी देवस्थान येथे चि. राकेश कोडापे व चि. सौ. कां. वृषाली नैताम यांचा शुभविवाह सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या आनंददायी सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवदांपत्याला शुभेच्छा दिल्या.
या विवाह सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्या तनुश्रीताई आत्राम यांची उपस्थिती होय. त्यांनी नवदांपत्याला आशीर्वाद देत त्यांच्या भावी आयुष्यासाठी सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य व यशस्वी वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, विवाह सोहळ्यानंतर टेक्सटाला येथील श्री रामकिष्टु निलम यांच्या नव्या घराच्या वास्तुपूजन कार्यक्रमालाही तनुश्रीताई आत्राम यांनी उपस्थिती लावली. धार्मिक विधी व पारंपरिक पद्धतीने पार पडलेल्या या कार्यक्रमात त्यांनी कुटुंबीयांना शुभेच्छा देत नव्या घरात सुख-शांती, भरभराट आणि आनंद नांदावा अशी सदिच्छा व्यक्त केली.
एकाच दिवशी विवाह सोहळा आणि वास्तुपूजन अशा दोन महत्त्वाच्या कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये तनुश्रीताई आत्राम यांच्या उपस्थितीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक आमदारांच्या कन्या तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि सार्वजनिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या तनुश्रीताईंच्या उपस्थितीची नागरिकांमध्ये विशेष चर्चा रंगली.
दोन्ही कार्यक्रमांमध्ये त्यांनी सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधत आपुलकीचे संबंध जपल्याने उपस्थितांकडून त्यांचे कौतुक करण्यात आले. त्यामुळे हे दोन्ही कार्यक्रम केवळ कौटुंबिक न राहता सामाजिक एकात्मता आणि जनसंपर्काचा उत्सव ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
