पावसाळा दारात, प्रशासन झोपेत; पुसुकपल्लीतील तुंबलेल्या नाल्यांनी उघड केली विकासाची पोलखोल!
“आजार पसरल्यानंतर जाग येणार का?” – संतप्त ग्रामस्थांचा सवाल
प्रतिनिधि :- तिरुपती मडावी अहेरी
अहेरी : पंचायत समिती अहेरी अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत नागेपल्लीच्या वॉर्ड क्रमांक ०५ मधील पुसुकपल्ली गावात प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे गंभीर स्वच्छता संकट निर्माण झाले आहे. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना गावातील नाल्या मात्र गाळ, कचरा आणि झुडपांनी पूर्णपणे तुंबल्या असून सांडपाण्याचा निचरा ठप्प झाला आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गेल्या अनेक वर्षांपासून नाल्यांची नियमित साफसफाई करण्यात आलेली नाही. परिणामी नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून पाण्याचा प्रवाह पूर्णतः अडथळला आहे. शासन दरवर्षी स्वच्छता, आरोग्य आणि ग्रामविकासासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च करत असल्याचा दावा करते; मात्र पुसुकपल्लीची परिस्थिती पाहता हे दावे केवळ कागदावरच असल्याचे दिसून येत आहे.
आगामी काळात मुसळधार पाऊस झाल्यास नाल्यांचे पाणी रस्त्यांवर आणि घरांमध्ये शिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान होण्याबरोबरच दैनंदिन जीवनही विस्कळीत होण्याची शक्यता आहे. गाव संकटाच्या उंबरठ्यावर उभे असताना ग्रामपंचायत आणि संबंधित विभाग मात्र मौन बाळगून असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
नाल्यांमध्ये साचलेल्या घाणीमुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया यांसारख्या साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला असून प्रशासन एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
ग्रामस्थांनी अनेकदा संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला; मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी असून “कर वसुलीत प्रशासन पुढे, पण मूलभूत सुविधा देताना मागे” अशी तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.
पावसाळ्यापूर्वी तातडीने नाल्यांचा गाळ उपसा, स्वच्छता मोहीम आणि सांडपाणी व्यवस्थापनाची कामे हाती घेण्यात आली नाहीत तर भविष्यात उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीसाठी संबंधित प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
आता प्रश्न एकच — पावसाचे पाणी घरात शिरल्यानंतर आणि साथीचे रोग पसरल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? की पुसुकपल्लीवासीयांच्या समस्यांची तातडीने दखल घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार? गावकऱ्यांचे लक्ष आता प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे.
