विशेष प्रतिनिधी :- उमेश गझलपेल्लीवार
*आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने गडचिरोली पोलीस दलामार्फत सामुहिक योग शिबिराचे आयोजन*
सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालये, पोस्टे/उपपोस्टे/पोमकें येथे देखील पार पडले योग शिबिर
पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे आयोजीत योग शिबिरात वरिष्ठ अधिकार्यासह ७०० हून अधिक अधिकारी व अंमलदार यांनी घेतला सहभाग
दिनांक २१ जून हा दिवस संपूर्ण जगामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यामध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्य साधारण महत्व आहे. आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनात योगासनाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तंदरुस्त ठेवण्याकरिता, आपले शरीर आणि मन सशक्त करता येण्याकरिता आज रोजी २१/०६/२०२६ रोजी १२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने गडचिरोली पोलीस मुख्यालय येथे सकाळी ०६:०० वाजता योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. यासोबतच पोलीस उप-मुख्यालय, प्राणहिता आणि सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोस्टे/उपपोस्टे पोमकें येथे सामुहिक योग शिबिराचे आयोजन करण्यात आले.
पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथील योग शिबिरामध्ये पोलीस अधीक्षक कार्यालय, पोलीस मुख्यालय, विशेष अभियान पथक व राज्य राखीव पोलीस दल येथील ७०० हून अधिक पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. तसेच पोलीस उप-मुख्यालय, प्राणहिता येथील योग शिबिरामध्ये पोलीस उप-मुख्यालय, विशेष अभियान पथक (प्राणहीता) व सीआरपीएफ चे जवळपास ५०० पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. या योग शिबिरामध्ये योगाचे विविध प्रकार शिकविण्यात आले. तसेच पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथील योग शिबिरादरम्यान योगा प्रशिक्षक श्री. मिलिंद उमरे व श्रीमती. अंजली कुळमेथे यांनी उपस्थित सर्व पोलीस अधिकारी/अंमलदार यांना योगासनाचे महत्व पटवून सांगितले. यासोबतच योग कसा करावा, कोणती योगासने शरीराला आणि मनाला सशक्त व सक्षम ठेवू शकतात याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश यांनी सर्वांना आपल्या जीवन शैलीमध्ये व्यायामाला स्थान देऊन रोज कमीत कमी २० मिनीटे सर्वांनी योगासाठी वेळ देण्याचे आवाहन केले आहे.
सदर योग शिबिरामध्ये पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) श्री. हर्षवर्धन बी. जे., सहाय्यक पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. अनिकेत हिरडे, पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे, उप-विभागीय पोलीस अधिकारी, अहेरी श्री. अजय कोकाटे तसेच सर्व शाखांचे अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
सदर शिबिराच्या यशस्वीतेसाठी गडचिरोली पोलीस मुख्यालयाचे रापोनि. श्री. अनुजकुमार मडामे, पोलीस कल्याण शाखेचे प्रभारी अधिकारी श्री. नरेंद्र पिवाल व इतर शाखा/पोस्टे/उपपोस्टे/पोमकेंचे प्रभारी अधिकारी/अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.
