७८ वर्षे स्वातंत्र्य मिळूनही बेज्जुरपेल्ली ग्रामपंचायत विकासापासून वंचित; आदिवासी बांधवांची व्यथा कायम
देशाला स्वातंत्र्य मिळून तब्बल ७८ वर्षे उलटली, शासनाच्या विविध विकास योजनांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असतानाही अहेरी तालुक्यातील बेज्जुरपेल्ली ग्रामपंचायत आजही मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे चित्र दिसून येत आहे. आदिवासीबहुल असलेल्या या गावातील नागरिकांना आजही अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून विकासाच्या दाव्यांना येथे वास्तवाचा धक्का बसत आहे.
गावातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय असून पावसाळ्यात चिखल आणि पाण्यामुळे नागरिकांना ये-जा करणे कठीण होते. अनेक ठिकाणी नाल्यांची व्यवस्था नसल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहत असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना अंधारात दिवस काढावे लागत आहेत.
याशिवाय गावात नियमित बससेवा नसल्याने विद्यार्थी, शेतकरी, रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आरोग्य, शिक्षण आणि रोजगाराच्या संधींपासूनही गावकरी दूर राहत असल्याची खंत स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, अनेक वेळा शासन व प्रशासनाकडे निवेदने देऊनही समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. निवडणुकांच्या काळात विकासाची आश्वासने दिली जातात; मात्र प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही बदल होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
“आम्हीही या देशाचे नागरिक आहोत. आम्हाला रस्ते, वीज, पाणी, बससेवा आणि इतर मूलभूत सुविधा मिळणे हा आमचा अधिकार आहे. शासन व प्रशासनाने आमच्या गावाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ विकासकामे हाती घ्यावीत,” अशी मागणी बेज्जुरपेल्ली येथील आदिवासी बांधवांनी केली आहे.
स्वातंत्र्याच्या अमृतकाळातही विकासाची वाट पाहणाऱ्या बेज्जुरपेल्ली ग्रामपंचायतीकडे शासन आणि प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज असून, अन्यथा ग्रामस्थांचा संताप आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
