विद्युत विभागाचे ढिसाळ नियोजन; दोन दिवसांपासून ९ गावांचा अंधारात जीव, नागरिकांचा संताप!
एटापल्ली, प्रतिनिधी : गिरीश नरोटे
एमएसईबी कार्यालय एटापल्ली अंतर्गत येणाऱ्या कसनसूर सब-सेंटरच्या हद्दीतील तब्बल ९ गावांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित असल्याने नागरिकांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ग्रामीण भागातील जनतेला अंधारात रात्र काढण्याची वेळ आली असून विद्युत विभागाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार चोखेवाडा, कोहिंदूड, मेंढरी, कारका (बु.), जवेली (बु.), करेंम, मगदंडी, रोपी आणि कान्हाडगाव या गावांमध्ये दिनांक २३ रोजी केवळ पाच मिनिटांसाठी वीज आली आणि त्यानंतर पुन्हा खंडित झाली. त्यानंतर रात्रभर आणि संपूर्ण दुसऱ्या दिवशीही वीजपुरवठा सुरळीत झाला नाही. दिनांक २४ रोजीही दिवसभर वीज नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
वीज नसल्यामुळे रात्री गावांमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरले असून नागरिकांना मच्छरांचा प्रचंड त्रास सहन करत जागून रात्र काढावी लागत आहे. लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींचे विशेष हाल होत आहेत.
ग्रामस्थांनी लाईनमनशी संपर्क साधला असता काही वेळासाठी वीज सुरू झाली; मात्र पुन्हा खंडित झाली. गावात विद्युत सेवक म्हणून कार्यरत असलेले श्री. मोतीराम नैतम हे देखील वारंवारच्या बिघाडामुळे त्रस्त झाले असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच एमएसईबीचे कर्मचारी श्री. गोहोने यांच्याशी संपर्क साधला असता “वीजपुरवठा लवकरच सुरू होईल” असे आश्वासन देण्यात आले; मात्र अद्यापही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही.
“अधिकारी झोपेत, जनता अंधारात!”
सततच्या वीज खंडितामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट असून, “विद्युत विभागाच्या ढिसाळ कारभाराचा फटका सामान्य जनतेला बसत आहे. अधिकारी झोपेत आहेत आणि जनता अंधारात जीवन जगत आहे,” अशा तीव्र शब्दांत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी
संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन बिघाड दूर करावा व ९ गावांचा वीजपुरवठा पूर्ववत सुरू करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
“दोन दिवसांचा अंधार, प्रशासन मात्र बेफिकीर; ग्रामीण जनतेच्या सहनशीलतेची परीक्षा किती दिवस?” अशी संतप्त प्रतिक्रिया परिसरातून उमटत आहे.
