*उमेश गझलपेल्लीवार*
विशेष प्रतिनिधी गडचिरोली
*गडचिरोली पोलिसांचा ‘ऑल आऊट’ ऑपरेशन: अवैध दारू धंद्यांवर मोठी कारवाई; ५ लाखांचा मुद्देमाल जप्त*
गडचिरोली जिल्ह्यातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी आणि गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी २४ जून रोजी विशेष ‘ऑपरेशन ऑल आऊट’ आणि कोंबिंग ऑपरेशन राबविले. या धडक मोहिमेत अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध १३ कारवाया करून पोलिसांनी ५ लाख ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबविण्यात आली. गडचिरोली, आरमोरी आणि चामोर्शी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. विविध ठिकाणी धाडी टाकून अवैधरित्या साठवून ठेवलेली दारू जप्त करण्यात आली.
फक्त दारूच नव्हे, तर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी अन्य आघाड्यांवरही काम केले. १३९ सराईत आणि अभिलेखावरील गुन्हेगारांची प्रत्यक्ष जाऊन पडताळणी करण्यात आली. शहरातील हॉटेल्स, लॉजेस आणि संशयास्पद निर्जन स्थळांची कसून तपासणी करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान ३०० वाहनांची तपासणी केली असून, मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ४० वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
पोलिसांच्या या आक्रमक भूमिकेमुळे अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या मोहिमेमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना बळकट झाली आहे. याबाबत बोलताना पोलीस अधीक्षक एम. रमेश म्हणाले की, “जिल्ह्यातील अवैध व्यवसाय आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना थारा दिला जाणार नाही. यापुढेही अशा प्रकारच्या विशेष मोहिमा सातत्याने राबवून कायदेशीर कारवाई सुरूच ठेवली जाईल.”
