तनुश्रीताई आत्राम यांची जिल्हा सामान्य रुग्णालयाला आकस्मिक भेट; वीजपुरवठा खंडित झाल्याने अधिकाऱ्यांना धारेवर धरले
| प्रतिनिधी:- तिरुपती मडावी
गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील वीजपुरवठा मंगळवारी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास खंडित झाल्याने रुग्णांचे मोठे हाल होत असल्याची माहिती एका रुग्णाने राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष तथा गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्या तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांना दूरध्वनीवर दिली.
ही माहिती मिळताच तनुश्रीताई आत्राम यांनी क्षणाचाही विलंब न करता थेट जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी विविध वॉर्डमध्ये जाऊन रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधत प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. रुग्णालयातील बहुतांश भाग अंधारात असल्याने रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
यानंतर त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक (सीएस) किलनाके मॅडम यांच्याशी तातडीने दूरध्वनीवर संपर्क साधून त्यांना रुग्णालयात बोलावले. रुग्णांच्या गैरसोयीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.
यावेळी त्यांनी रुग्णालय परिसरातील तुटलेल्या विद्युत तारा व सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामाचीही प्रत्यक्ष पाहणी केली. वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करून रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
“पुढील एका तासात वीजपुरवठा सुरळीत झाला नाही, तर मी पुन्हा रुग्णालयात येऊन परिस्थितीचा आढावा घेईन आणि संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करेन,” असा इशाराही तनुश्रीताई आत्राम यांनी प्रशासनाला दिला.
या आकस्मिक भेटीमुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले असून, रुग्णालयातील मूलभूत सुविधांबाबत प्रशासनाने अधिक दक्ष राहण्याची गरज असल्याची भावना व्यक्त होत आहे.
