भगवंतराव महाविद्यालयात पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा उत्साहात संपन्न
एटापल्ली | प्रतिनिधी :- तिरुपती मडावी
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र, गडचिरोली, मॉडेल करिअर सेंटर, गडचिरोली आणि भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय, एटापल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा दि. 30 जून 2026 रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात उत्साहात पार पडला.
या रोजगार मेळाव्यात L&T Finance (चामोर्शी व आलापल्ली क्षेत्र), Nancy Health Care Service (नागपूर, हैदराबाद व विशाखापट्टणम) आणि Adecco FMCG (हैदराबाद, तेलंगणा) या नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. ए. बुटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सौरभ कावडे (जिल्हा कौशल्य विकास कार्यालय, गडचिरोली), अरुणा सक्रापुरे, नर्सिंग मेटी (नॅन्सी हेल्थ केअर सर्व्हिस, हैदराबाद), प्रा. राहुल ढबाले (करिअर कट्टा समन्वयक), प्रा. अतुल बारसागडे (सहसमन्वयक) यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रोजगार मेळाव्यास 38 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्यापैकी 11 विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड झाली असून त्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी, माजी विद्यार्थी तसेच एटापल्ली तालुक्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा रोजगार मेळावा अत्यंत उपयुक्त ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
