निसर्गाचे संतुलन कायम राखण्यात विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वाची – वनपरिक्षेत्रधिकारी विलास कोसनकर
अहेरी : धावपळीच्या आणि भौतिक सुखाच्या जगात निसर्गाकडे लक्ष देण्यासाठी कुणालाच वेळ नाही. काही विघ्नसंतोषी निसर्गाला नष्ट करायला निघालेले आहेत. यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. अशा परिस्थितीत निसर्गाचे संतुलन कायम राखण्यासाठी विद्यार्थी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात असे प्रतिपादन वनपरिक्षेत्रधिकारी विलास कोसनकर यांनी केले.
पर्यावरण रक्षणात विद्यार्थ्यांची भूमिका या विषयावर व्याख्यानाचे आयोजन भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्था, अहेरी द्वारा संचलित भगवंतराव उच्च माध्यमिक आश्रम शाळा कमलापूर येथे करण्यात आले होते. यावेळेस ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. सोहेल शेख होते. प्रमुख उपस्थिती प्रा. आशिष ठाकरे, विजय सरदार, सामाजिक कार्यकर्ते खोजेन्द्रनाथ सिडाम यांची होती.
आयोजित व्याख्यानात पुढे बोलताना वनपरिक्षेत्र अधिकारी विलास कोसनकर पुढे म्हणाले की, गेल्या पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीत पर्यावरणात घडून आलेल्या बदलाचा अभ्यास केला तर पर्यावरणात जे काही नकारात्मक बदल निर्माण झालेले आहेत. त्याला मानवच जबाबदार आहे. मानव आपल्या स्वार्थासाठी निसर्गाचा वापर करीत असताना स्पष्टपणे दिसते. एकेकाळी मुक्तपणे संचार करणारे वन्यजीव आता तुरळक प्रमाणात दिसायला लागले आहे. यातून मार्ग काढण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी प्रयत्न करू शकतात. पर्यावरणाचे संतुलन कायम ठेवण्यासाठी विद्यार्थी आपल्या गावांमध्ये जनजागृती करू शकतात. जनतेला मार्गदर्शन करू शकतात. विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला तर निश्चितच पुढील काळ पर्यावरणाच्या अनुषंगाने सकारात्मक असेल असे ते म्हणाले.
वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय रेपनपल्ली यांच्याकडून विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. आशिष ठाकरे यांनी केले. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्राचार्य किशोर बुरबुरे यांनी करून दिला. आभार महेश गावडे यांनी मानले.
